पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यामुळे प्रभागरचना ‘जैसे थे’ राहणार आहे. २०१७ प्रमाणे चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, ३२ प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणेच १२८ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. मात्र करोना, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे महापालिका निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती. न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता राज्य शासनाने प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येला महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. तेच कायम राहणार आहे.
आतापर्यंतची प्रभाग रचना
- महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. मात्र, १९८६ पर्यंत प्रशासकीय राजवट
- १९८६ – पहिली निवडणूक झाली. एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६० प्रभाग
- १९९२ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७८ प्रभाग
- १९९७ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ७९ प्रभाग
- २००२ तीन सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३५ प्रभाग
- २००७ – एक सदस्यीय प्रभाग पद्धती, नगरसेवक संख्या १०५
- २०१२ – द्विसदस्यीय प्रभाग पद्धती आणि ६४ प्रभाग
- २०१७ – चार सदस्यीय प्रभाग पद्धती आणि ३२ प्रभाग
२०१७ मधील पक्षीय बलाबल
भाजप – ७७
राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३६
शिवसेना – ९
मनसे – १
अपक्ष – ५
राज्य शासनाचा आदेश आला आहे. चार सदस्यांचा प्रभाग करण्याबाबत सुचविले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका