पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याचे भान २०२६-२७ चा अर्थसंकल्प तयार करताना ठेवावे. अर्थसंकल्पात नवीन कामांचा समावेश करण्यापेक्षा निर्माणाधीन आणि अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आदेश महापालिका आयुक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाबाबत आयुक्त हर्डीकर यांनी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे या वेळी उपस्थित होते. मुख्य लेखा व वित्त अधिकारी जैन यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा तपशीलवार आढावा सादर केला. अर्थसंकल्पातील सर्वसाधारण निधीची तरतूद, विविध बँकांमधील मुदत ठेवी, विद्यमान कर्जाची स्थिती, मागील चार वर्षांतील जमा खर्च, मासिक महसुली खर्चाची आवश्यकता, अस्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांना देण्यात येणारे मानधन, दायित्व निधी, मुद्रांक शुल्क व अन्य उत्पन्नाचा गोषवारा तसेच करसंकलन विभागाची मागील तीन वर्षांची आणि चालू वर्षातील कामगिरी याविषयीची माहिती त्यांनी दिली. विविध विभागांना प्रस्तावित निधीची तरतूद, अंतिम टप्प्यात असलेली विकासकामे आणि नव्याने सुरू करणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘अर्थसंकल्प तयार करताना विविध विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे. नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहील, त्या दृष्टीने सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. उपलब्ध संसाधनांचा योग्य व कार्यक्षम वापर करून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा देताना लोकप्रतिनिधींचे सहकार्य देखील प्रशासनाला लाभणार आहे. महसूलवाढ, करसंकलन, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूक, पर्यावरणीय संतुलन राखणारे प्रकल्प, क्रीडा सुविधा विकास, तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल.
शहरातील अंतिम टप्प्यातील कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, आरोग्य व वैद्यकीय सुविधा बळकट केल्या जाणार आहेत. पर्यावरण, आरोग्य, क्रीडा आणि वैद्यकीय सेवा या मुख्य क्षेत्रांवर भरीव तरतूद करून प्रत्येक घटकापर्यंत सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
अंतिम टप्प्यातील विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहेत. नव्याने प्रस्तावित प्रकल्प राबविताना आर्थिक शाश्वतता आणि नागरिकहित हा निकष ठेवला जाणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
