पिंपरी : एके काळी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली आहे. सन २०१५-१६ मध्ये सहा हजार ८६२ कोटी ८९ लाख रुपयांच्या असलेल्या ठेवी २०२५ मध्ये चार हजार ८९४ कोटी ७८ लाखांवर घसरल्या आहेत. दशकभरात एक हजार ९६८ कोटी ११ लाखांनी ठेवींत घट झाली आहे. महापालिकेवर ५६० कोटी रुपयांचे कर्जही आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प फुगत असताना उत्पन्न घटत आहे. चालू आर्थिक वर्षाचा (२०२५-२६) महापालिकेचा अर्थसंकल्प नऊ हजार ६७५ कोटी २७ लाख रुपयांचा आहे. अर्थसंकल्पाचे आकडे वाढत असताना उत्पन्न मात्र घटत आहे. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या ठेवींची माहिती मागविली होती. लेखा विभागाने लांडगे यांना लेखी माहिती दिली आहे. तत्कालीन एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना सन २०१५-१६ मध्ये महापालिकेकडे सर्वसाधारण आणि इतर निधी मिळून सहा हजार ८६२ कोटी ८९ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. त्यानंतर काही वर्षांत ठेवींत मोठी घट झाली. सन २०१८-१९ मध्ये या ठेवी चार हजार १९४ कोटींवर, तर २०२२-२३ मध्ये तीन हजार ४७३ कोटी रुपयांवर आल्या. त्यानंतर २०२३-२४ मध्ये ठेवी वाढून पाच हजार ६३३ कोटींवर पोहोचल्या. मात्र, पुन्हा २०२४-२५ मध्ये चार हजार ८९४ कोटी ७८ लाखांवर आल्या.

महापालिकेवर ५६० कोटींचे कर्ज

महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी १५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते कर्ज ३० वर्षांसाठी आहे. मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी चार वर्षे कालावधीसाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. हरित सेतू आणि टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिझाइनद्वारे सुशोभीकरण करण्यासाठी हरित कर्जरोख्यांद्वारे २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले आहे. त्याचा कालावधी पाच वर्षे आहे. महापालिकेने आतापर्यंत ५५९ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यापैकी ३६४ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्ज फेडणे बाकी आहे.

चालू आर्थिक वर्षातील ऑक्टोबर २०२५ पर्यंत महापालिकेकडे चार हजार ८९४ कोटी रुपयांच्या मुदतठेवी आहेत. महापालिकेने विविध विकासकामांसाठी कर्जरोखे काढले आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून ४६ कोटींचे अनुदान मिळणार आहे. त्यापैकी २६ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, २० कोटी प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.