पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची रक्कम थेट बँक खात्यावर (डीबीटी) दिली जाणार आहे. १५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर १ जुलैपर्यंत विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार ५०० रुपये, तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार ७०० रुपये देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर वर्षी महापालिकेच्या वतीने दोन शालेय गणवेश, एक पीटी गणवेश, एक स्वेटर, एक रेनकोट दिला जातो. तसेच शालेय साहित्यामध्ये दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही व इतर साहित्य दिले जाते. दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, प्रयोगवही अशा विविध साहित्यांचे वाटप न करता त्याची रक्कम विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. हेही वाचा >>> रिंगरोड सुसाट…,जाणून घ्या कशी फुटणार पुण्याची वाहतूक कोंडी दप्तर, रेनकोट, बूट, मोजे, पाणी बॉटल, कंपास पेटी, व्यवसायमाला, स्वाध्यायमाला, चित्रकला वही, नकाशा, १०० आणि २०० पानी वही या साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार ५०० रुपये, तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन हजार ७०० रुपये देण्यात येणार आहेत. महापालिका शाळेतील विद्यार्थी किंवा पालकांच्या बँक खात्याची माहिती संकलित झाली आहे. माहितीची खातरजमा करून विद्यार्थ्यांना बँक खात्यात साहित्याची रक्कम जमा केली जाणार आहे. -प्रदीप जांभळे, अतिरिक्त आयुक्त