पिंपरी : ‘अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घ काळ योगदान देऊन पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक सर्वसाधारण सभेत एका कलाकाराचा विशेष सत्कार केला जाणार आहे,’ अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा समितीचे सभापती कैलास कुटे, उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, राजेश आगळे, किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक या वेळी उपस्थित होते.
‘शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही महापालिकेची सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे. या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. शहरातील सांस्कृतिक चळवळींना अधिक बळ मिळेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत असून, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रालाही तितकेच प्रोत्साहन दिले जाते,’ असे लांडगे यांनी सांगितले.
सन्मान होणाऱ्या कलावंतांची नावे
क्रीडा समितीच्या वतीने शहरातील ज्येष्ठ कलाकारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ कथक नृत्यकलाकार नंदकिशोर कपोते, अभिनेते मधुकर जोशी, तबलावादक धोंडिराम सायकर, लेखक रमेश वाकनीस, अभिनेते सुहास जोशी, साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, लेखिका कल्पना क्षीरसागर, गायिका वंदना घांगुर्डे, शास्त्रीय गायक पं. सुधाकर चव्हाण, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, भरतनाट्यम् नृत्यांगना गीता शर्मा, दिग्दर्शक डॉ. संजीवकुमार पाटील, चित्रकार प्रफुल्ल भिष्णूकर, क्रीडा प्रशिक्षक डॉ. मनोज देवळेकर, कथक नृत्यकलाकार वैशाली धोंगडे, संगीतकार श्रीकृष्ण कालमित्रा, कवयित्री सीमा गांधी, चित्रकार संजय काळभोर यांचा समावेश आहे.
