पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिपाई पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाकडून पैसे घेतले. त्यानंतर तरुणाला बनावट सही शिक्क्याचे नियुक्तीपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक देऊन नोकरी लागल्याची खात्री पटवून दिली. तरुणाने महापालिकेमध्ये याबाबत चौकशी केली असता अशा प्रकारे कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे उघडकीस  आले. त्यानंतर तरुणाने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी २६ वर्षीय तरुणाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणाविरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागील काही महिन्यांमध्ये कोणतीही पदभरती केलेली नाही. आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. महापालिकेत शिपाई पदांसाठी भरती सुरु असल्याचे सांगून फिर्यादीला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले.

 खात्री पटावी यासाठी त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रे देखील घेतली. त्यांच्याकडून वेळोवेळी सहा हजार ५०० रुपये घेतले. महापालिकेत नोकरी लागल्याचे सांगून त्यांना महापालिकेच्या नावाने सही शिक्का असलेले बनावट नियुक्तीपत्र आणि उमेदवारांच्या नावाचे परिपत्रक तयार करून पाठवले. त्यांना मासिक १६ हजार रुपये पगार तसेच १६ हजार रुपये महागाई भत्ता मिळणार असल्याचे सांगण्यात आले. नियुक्ती पत्रावर विभाग, कामावर रुजू होण्याची तारीख नमूद केली. आपल्याला नोकरी लागल्याचा आनंद फिर्यादीने व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात जाऊन चौकशी केली. तिथे अशा प्रकारची कोणतीही भरती प्रक्रिया राबवली नसल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मोटारीला दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

मोटार भाड्याने घेऊन त्याचा दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन एका व्यक्तीची मोटार हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना आळंदी येथे घडली.

या प्रकरणी एका व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची पांढऱ्या रंगाची मोटार दरमहा १८ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून नेली. मात्र, त्यानंतर आरोपीने कोणताही परतावा दिला नाही आणि मोटारही परत न करता वाहनाचा अपहार केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

हॉटेल व्यावसायिकाला आणि कॅशिअरला मारहाण

वॉचमनला शिवीगाळ का करता असे विचारल्याच्या रागातून दोन तरुणांनी हॉटेल मालक आणि कॅशिअरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना ताथवडेत घडली.

या प्रकरणी २८ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे वॉचमनला शिवीगाळ करत असताना फिर्यादीने त्यांना जाब विचारला. याचा राग धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी आणि हॉटेलचा कॅशिअरला मारहाण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

चिखलात ढकलल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

चिखलात ढकलल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून तिघांनी मिळून एका कामगाराला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी  कुरुळी येथे घडली.

या प्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रूमवर झोपलेले असताना आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून त्यांना गाठले. आरोपींनी लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. त्यांचा हात फॅक्चर झाला. तसेच फिर्यादीचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.