पिंपरी : पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केलेले असताना, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना वाहन खर्च प्रतिपूर्तीची रक्कम वाढवून, ती दरमहा ५० हजार रुपये करण्यात येणार आहे. वाहन किंमत, देखभाल-दुरुस्ती, इंधन, वाहनचालकांचे वेतन व इतर दरांमध्ये वाढ झाल्याने प्रतिपूर्ती रकमेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेचे पदाधिकारी व वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना स्वतःचे चारचाकी वाहन शासकीय कामकाजासाठी वापरण्यासाठीचे वाहन वाटप धोरण सन २०१७ मध्ये निश्चित करण्यात आले. त्यानुसार, पदाधिकारी आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना खासगी वाहन वापरल्याबद्दल पेट्रोलच्या वाहनासाठी दरमहा ३९ हजार ५६० रुपये आणि डिझेल वाहनासाठी दरमहा ३६ हजार ५६० रुपये रक्कम दिली जाते. या धोरणास प्रतिसाद देऊन अनेक पदाधिकारी व अधिकारी स्वतःचे खासगी चारचाकी वाहन वापरत आहेत. त्यामुळे महापालिकेची मोठी बचत होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.
दरम्यान, वाहनांवरील खर्च वाढल्याचे कारण देऊन प्रतिपूर्ती रक्कम ५० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव १५ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
महापौर दौऱ्यावर जाणार का?
महापौर रवी लांडगे यांचा स्वीय सहायकासह अझरबैजान दौरा निश्चित झाला होता. अझरबैजानची राजधानी बाकू येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्र मानव वस्ती कार्यक्रमांतर्गत (यूएन-हैबिटैट) वर्ल्ड अर्बन फोरमच्या १७ ते २२ मे दरम्यान होणाऱ्या संमेलनात ते सहभागी होणार आहेत. परंतु, आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळण्यासह पेट्रोल, डिझेल, गॅसचा वापर कमी करण्याचा सल्ला देशवासीयांना दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारच्या मंत्र्यांनीही दौरे रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर, महापौर लांडगे दौऱ्यावर जाणार, की पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दौरा रद्द करणार, याची उत्सुकता आहे.
