पिंपरी : ‘बाेगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये वाढ-घट करून ६० काेटी रुपयांची देयके ठेकेदारांना दिल्याप्रकरणी प्राथमिक अहवालात मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन दाेषी आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ फाैजदारी गुन्हा दाखल करावा,’ असा आदेश महापाैर रवी लांडगे यांनी आयुक्तांना दिला. आयुक्तांनी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी जैन यांच्यावर गुन्हा दाखल करू,’ असा इशाराही महापाैरांनी दिला.

महापौर लांडगे यांची शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. उपमहापाैर शर्मिला बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर, नगरसेवक कुणाल वाव्हळकर या वेळी उपस्थित होते. ‘महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी जैन यांनी स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचा अवमान केला आहे. त्यांनी मान्यता न घेता बोगस उपसूचनांच्या आधारे देयके दिली आहेत. ६० काेटी रुपयांचे प्रकरण माफ करण्यासारखे नाही. जैन यांची कार्यपद्धती चुकीची आहे. त्यांनी उपसूचना याेग्य आहेत की, नाही याची तपासणी करणे आवश्यक होते. चुकीचा कारभार करण्यास काेणी भाग पाडले असेल, तर जैन यांनी त्यांची नावे जाहीर करावीत,’ असेही महापाैर म्हणाले.

‘पाच सदस्यीय समितीने दिलेल्या प्राथमिक चाैकशी अहवालात जैन दाेषी आढळून आले आहेत. आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी तत्काळ जैन यांच्यावर फाैजदारी गुन्हा दाखल करावा. आयुक्तांनी गुन्हा दाखल न केल्यास आम्ही प्रमुख पदाधिकारी जैन यांच्यावर गुन्हा दाखल करू. जैन यांच्यावर कारवाई हाेत नाही, ताेपर्यंत शांत बसणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

‘प्राथमिक चौकशी अहवालात जैन हे दाेषी असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. दहा दिवसांत सविस्तर अंतिम अहवाल येणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका घेतली जाईल,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे म्हणाले. विराेधी पक्षनेते भाेईर म्हणाले, की ६० काेटी रुपयांच्या बाेगस उपसूचना प्रकरणामुळे महापालिकेची प्रतिमा डागाळली आहे. या प्रकरणात जे काेणी दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी.’

नगरसचिव बदलाच्या हालचाली?

एप्रिल महिन्याच्या तहकूब केलेल्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रावर २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्याचा कोणताही विषय नसताना सुधारित अर्थसंकल्पाला मान्यता दिल्याचे महापौर लांडगे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे अडचणीत आलेल्या महापौरांनी चूक झाल्याचे मान्य करून सुधारणा करणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु, नगरसचिवांनी सभेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. आता नगरसचिव म्हणून कार्यरत असलेले सहायक आयुक्त मुकेश काेळप यांची गच्छंती करण्याचा निर्णय महापाैरांनी घेतला आहे. त्यांच्या जागी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी पत्नीला भाजपकडून उमेदवारी मागितलेल्या निवृत्त नगरसचिवाला मानधन तत्त्वावर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.