पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नालेसफाईला सुरुवात करण्याची सूचना आरोग्य विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे. एप्रिलअखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण केली जाणार आहे.शहरामध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे १०० किलाेमीटर अंतराचे १४३ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात.
नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घरे व दुकानांमध्ये शिरते.
पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दर वर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, चेंबर आणि गटारे स्वच्छ केली जातात.गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, रूपीनगर, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापाेडी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले हाेते.
त्यामुळे शेकडाे नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ महापालिकेवर आली हाेती. यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण हाेऊ नये, यासाठी महापालिकेने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. नालेसफाईला सुरुवात करण्याबाबत स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालय – नाल्यांची संख्या
अ – २५
ब – १५
क – २८
ड – १२
इ – १६
फ – १८
ग – ९
ह – २०
एकूण – १४३
जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई केली जाईल. अरुंद नाल्यांच्या ठिकाणी यंत्रे जात नाहीत. अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्यात येणार आहे. नालेसफाईपूर्वीची व नंतरची छायाचित्रे घेतली जातील. नालेसफाईचा आढावाही घेण्यात येणार आहे. नालेसफाईचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त
डाॅ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
