पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने (२०२५-२६) या आर्थिक वर्षात ९४७ कोटी रुपयांचा कर वसूल केला आहे. ७ लाख ३२ हजार मालमत्ता धारकांपैकी ६ लाख २७ हजार ७९० मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला आहे.

गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता लाखबंद, नळजोड खंडित करणे, वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौकात मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. ९४७ कोटींचा कर वसूल झाला आहे. निवासी ५ लाख ५२ हजार ४२, बिगरनिवासी ५२ हजार २११, औद्योगिक ४ हजार ७८३, मिश्र १३ हजार ६७४, मोकळ्या जमिनी पाच हजार ४९ आणि इतर ३१ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. ऑनलाइन माध्यमातून ७०६ कोटी ७२ लाख, धनादेशाद्वारे ११० काेटी ५२ लाख, रोखीने ८३ कोटी ८८ लाख, डिमांड ड्राफ्टद्वारे ७ कोटी ९ लाख आणि ‘ईडीसी’द्वारे ६ लाख रुपयांचा भरणा झाला आहे.

थकबाकीदारांना ४५ कोटींचे ‘अभय’

थकीत करवसुलीसाठी महापालिकेने एक मार्चपासून अभय याेजना राबविली. या याेजनेचा ३१ मार्चपर्यंत ८३ हजार ४७० थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. या मालमत्ताधारकांना ४५ कोटी १३ लाख रुपयांची सवलत मिळाली. ३१ दिवसांत १९७ कोटी १८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.

वाकडमधून सर्वाधिक कर

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे १८ विभाग आहेत. वाकड विभागीय कार्यालयातून सर्वाधिक ११७ कोटी १८ लाख, त्या खालोखाल थेरगाव ९७ कोटी ६१ लाख, चिंचवडमधून ७७ कोटी ३४ लाखांचा कर वसूल झाला आहे. पिंपरीनगर कार्यालयातून सर्वांत कमी आठ कोटी ४२ लाखांचा कर जमा झाला आहे.

कर संकलन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कामकाजामुळे आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सुलभ सुविधांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीनंतर कर वसुलीसाठी योग्य नियोजन केले. दोन महिन्यांत २५० कोटींचा कर वसूल करण्यात आला. त्यामुळे दुसऱ्यांदा ९५० कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश आल्याचे कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी म्हटले आहे.