देशात आणि राज्यात स्वछ भारत अभियान राबवले जात असताना देहूरोड तसेच किवळे परिसरातील अस्वच्छतेमुळे गेल्या २० वर्षापासून नागरिक हैराण झाले आहेत. स्मार्ट सिटीमध्ये समावेश असलेल्या पिंपरी चिंचवडला २०१६ मध्ये क्लीन सिटी चा पुरस्कार मिळाला होता. मात्र, पालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या परिसरात अस्वच्छतेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील शहर स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या मोहीम राबविल्या जात आहेत. मात्र, शहरामधील नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांकडून गुरुवारी पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाविरोधात डब्बा आंदोलन करण्यात आले. यामध्ये महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.

पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ करण्यासाठी पालिका कोट्यवधींचा निधी मंजूर करते. मात्र, तरीही देहूरोड, किवळे परिसरातील नागरिकांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. देहूरोड परिसरात गेल्या २० वर्षांपासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. एवढ्या वर्षानंतरही महापालिकेला या परिसरातील स्वच्छतेविषयी जाग आलेली नाही. त्यामुळे देहूरोड येथील नागरिकांकडून पिंपरी-चिंचवड महापलिकेवर डब्बा आंदोलन करण्यात आले. देहूरोड आणि किवळे परिसरातील ड्रेनेज आणि शौचालयाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. या समस्येवर जर पालिकेने लवकरात लवकर तोडगा काढला नाही, तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देहूरोड आणि किवळे परिसरातील नागरिकांनी दिला आहे. शौचालयाच्या आणि ड्रेनेजच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे.
.