पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख उद्याने, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोफत वायफाय सेवा सुरू करण्याचा मानस महापालिकेने व्यक्त केला असून त्यानुसार, आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांच्या पुढाकाराने पिंपरी बाजारपेठेतील विविध प्रश्नांसाठी आयोजित बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शहर अभियंता महावीर कांबळे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे, माजी नगरसेवक हरेश आसवानी आदी उपस्थित होते.
आयुक्त वाघमारे यापूर्वी नव्या मुंबईत होते. तेथे त्यांनी वायफाय सेवा देण्याचा प्रयोग केला होता, त्या धर्तीवर िपपरीतही अशीच सेवा देण्याचा विचार त्यांनी रुजू झाल्यानंतर लागलीच केला होता. त्यानुसार, बैठकीत या विषयावर विस्ताराने चर्चा झाल्यानंतर आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या. यासंदर्भात, तज्ज्ञांच्या तसेच नागरिकांच्या सूचनाही स्वीकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या वेळी पालिका मुख्यालयात राष्ट्रध्वज उभारण्यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय, पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डाणपुलासाठी संरक्षण खात्याची जागा मिळवण्यासाठी येत्या आठवडय़ात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे. भाजीमंडई येथील दुमजली पार्किंग व वापरात नसलेल्या गाळ्यांबाबत पाहणी दौरा करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. बाजारपेठेतील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन करावे, अतिक्रमणविरोधी पथकाने आवश्यकतेनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.

Story img Loader