scorecardresearch

PCMC election 2017: ‘आयात’ उमेदवारांमुळे उद्योगनगरीवर भाजपचे वर्चस्व

भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेली पिंपरी-चिंचवड महानगर पालिका जिंकली

PCMC election 2017: ‘आयात’ उमेदवारांमुळे उद्योगनगरीवर भाजपचे वर्चस्व
पिंपरी चिंचवड निवडणूक जिंकल्यानंतर भाजप कार्यकर्ते

राष्ट्रवादीचे गेली कित्येक वर्षे सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुंसडी मारली. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होती. अनेक बड्या उमेदवारांना पाडत भारतीय जनता पक्षाने आपला विजय खेचून आणला. दोन वर्षापूर्वी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या लक्ष्मण जगताप यांनी पक्षप्रवेश केला, त्या वेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची आपण महानगर पालिकेमध्ये सत्ता आणू असे म्हटले होते. ज्यावेळी जगताप राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हा त्यांनी २५ पेक्षा जास्त आमदार निवडून आणले होते. इतकेच नव्हे तर महापौर शकुंतला धराडे यांनाही त्यांनीच निवडून आणले होते. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आणि महापालिकेत सत्ता स्थापन करू असा निर्धार केला. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.  या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ७८ उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे ३५ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेला १ जागेवर समाधान मानावे लागले तर पाच अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाने कितीही लोक आपल्याकडे खेचले तरी आपण जिंकू असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला होता. परंतु या निवडणुकीतील निकाल पाहता परिस्थिती अत्यंत निराळी आहे असेच दिसते. ज्या लक्ष्मण जगताप यांनी शकुंतला धराडे यांना राजकारणात येण्याची संधी दिली. त्याच धराडेंचा लक्ष्मण जगतापच्या उमेदवारांनी पराभव केला. लक्ष्मण जगताप यांच्या गटातील उषा मुंढे यांनी त्यांचा पराभव केला. २०१२ साली भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवडमध्ये ३ जागा होत्या. काँग्रेसच्या १४, मनसेच्या ४ आणि राष्ट्रवादीच्या ८३ जागा होत्या. भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ कैकपटीने वाढले आहे. तर राष्ट्रवादीला आपल्या निम्म्याहून अधिक जागा गमवाव्या लागल्या. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पिंपरी चिंचवडमध्ये होती. येथील जनतेनेही नवा पर्याय निवडल्याचे दिसले. पिंपरी चिंचवडमध्ये यावेळी विक्रमी मतदान झाले होते. मागील निवडणुकीमध्ये केवळ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानात १२ टक्क्यांनी वाढ होऊन मतदान ६७ टक्के झाले. याचा फायदा निश्चितपणे भारतीय जनता पक्षालाच झाला. सुरुवातीपासूनच पिंपरी चिंचवडमधील लढत ही भारतीय-जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस याच स्वरुपाची होती. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारांना संधी दिली आणि महानगरपालिकेवर ताबा मिळवला. शहरात अद्यापही पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही तसेच अत्याधुनिक सोयी-सुविधांपासून शहर अद्यापही दूर आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाला निवडून दिल्यास आम्ही झपाट्याने विकास करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारांचे जे ‘आउटगोईंग’ झाले त्याचा फटका पक्षाला निश्चितच बसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2017 at 20:08 IST

संबंधित बातम्या