पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला सरत्या आर्थिक वर्षात (२०२५-२६) ५ हजार ७५ कोटी ९२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न मात्र यंदा ८६ काेटी ५३ लाख रुपयांनी घटले आहे.
करसंकलन, बांधकाम परवानगी, अग्निशमन, आकाशचिन्ह व परवाना, पाणीपुरवठा, भूमी जिंदगी, प्राधिकरण भूखंड हस्तांतर आणि इतर विविध विभागांसह वस्तू व सेवाकर भरपाई (जीएसटी), मुद्रांक शुल्क, बँकेतील ठेवीवरील व्याज यांतून महापालिकेला हे उत्पन्न मिळाले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळकतकरातून सर्वाधिक महसूल जमा झाला. शहरातील नाेंदणीकृत ७ लाख ३२ हजार मिळकतधारकांपैकी ६ लाख ३१ हजार ६१५ मिळकतधारकांनी ३१ मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत ९६१ काेटी ७४ लाख रुपयांच्या करभरणा केला.
बांधकाम परवानगीच्या मुख्य शुल्कातून ७११ कोटी ५३ लाखांचे, तर यूटीएफ शुल्कातून ८३ कोटी २४ लाख रुपये, असे एकूण ७९४ केटी ७७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे बांधकाम विभागाचे सहशहर अभियंता सुनील भागवानी यांनी सांगितले. गेल्या वर्षी ८८१ कोटी ३० लाखांचे उत्पन्न मिळाले होते. शहरातील मोठ्या बांधकाम प्रकल्पांना महाराष्ट्र राज्यातील पर्यावरण विभागाच्या ‘ईएस’ प्रमाणपत्राऐवजी केंद्राच्या पर्यावरण विभागाच्या प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. त्या प्रमाणपत्रासाठी अधिक वेळ जात आहे. तसेच, जागा मोजणी प्रक्रिया रखडल्याने बांधकाम परवानगी विभागाचे उत्पन्न घटल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एकूण ७८ कोटींची पाणीपट्टी वसूल झाल्याचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘आकाशचिन्ह’च्या उत्पन्नात वाढ
आकाशचिन्ह व परवानगी विभागाला परवाना शुल्क आणि नूतनीकरण शुल्कातून २१ कोटी ५० लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी १९ कोटी ९४ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा १ कोटी ५६ लाख रुपयांनी उत्पन्नात भर पडली आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली होती. परवान्यांचे नूतनीकरण केल्यानेही उत्पन्न वाढल्याची माहिती उपायुक्त राजेश आगळे यांनी दिली.
अग्निशमन विभागाचे उत्पन्न १७८ काेटी
महापालिकेच्या अग्निशमन विभागाला १७८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी १६३ कोटी चार लाखांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा उत्पन्नामध्ये १५ कोटी २३ लाख रुपयांची वाढ झाल्याचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.
झोपडपट्टी सेवाकरातून एक कोटी
झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या महिला बचत गटांकडून प्रत्येक झोपडीधारकास सेवाकर देयकाचे वाटप करण्यात येते. ऑनलाइन देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा एक कोटी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती उपायुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.
‘जीएसटी’पोटी २३६७ काेटी
जीएसटी भरपाईतून वर्षभरात दोन हजार ३६७ कोटी २० लाख रुपये महापालिकेस प्राप्त झाले आहेत. मुद्रांक शुल्क विभागाकडून ४४३ कोटी २१ लाख मिळाले. बँकेतील ठेवींवर वर्षभरात १३६ कोटी रुपयांचे व्याज मिळाले. इतर विभागांतून १७० काेटी रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले.
