पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक २ मार्चला होणार आहे. सभापतिपदासाठींचे अर्ज आज (बुधवार, २५ फेब्रुवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत दाखल करता येणार आहेत. नऊ सदस्यीय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असल्याने सर्व समित्यांचे सभापती भाजपचेच होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीत १६ सदस्य असून, पाच विषय समित्यांमध्ये नऊ सदस्य आहेत. त्यामध्ये सत्ताधारी भाजपचे सहा आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे तीन सदस्य आहेत. सहा नगरसेवक असलेल्या शिवसेनेला विषय समित्यांमध्ये स्थान मिळाले नाही.

विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार विषय समित्यांच्या सभापतीची निवडणूक दोन मार्च रोजी होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हे पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्ज दाखल करताच सभापती कोण होणार हे स्पष्ट होईल. २ मार्चला अर्ध्या तासाच्या टप्प्याने पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सुरुवातीला विधी समिती सभापती निवडणूक होणार आहे. त्यानंतर महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण समिती सभापतींची निवडणूक होणार असल्याचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी अर्ज दाखल करणार

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी (बुधवार, २५ फेब्रुवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शनिवारी (२८ फेब्रुवारी) निवडणूक प्रक्रिया होणार आहे. थेरगावमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिषेक बारणे आणि वाकडचे प्रतिनिधित्व करीत असलेले संदीप कस्पटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे.