पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प शनिवारी (२८ फेब्रुवारी) सादर केला जाणार आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. निवड होताच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे. निवडणूक होताच दुपारी बारा वाजता स्थायी समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महापालिकेचा ४४ वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, दरवाढ नसणार आहे. चार वर्षांची प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींची राजवट सुरु झाली आहे. या अर्थसंकल्पात काेणत्या याेजना, प्रकल्प असणार याची नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाकडून २०२६-२७  चा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यासाठी विविध कामे, तरतुदींबाबत विभागनिहाय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. अर्थसंकल्पात केंद्र शासनाच्या पुरस्कृत विविध योजना, प्रशासकीय सुविधा, विविध विकासकामे, आरोग्य, स्थापत्य विषयक कामे, शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांसाठी अत्यावश्यक निधी, तरतुदी, महसूल आदी बाबींचा तपशील देण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पाला तत्काळ मान्यता द्यावी लागणार 

महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. चार हजार ४९३ काेटींचे महापालिकेवर दायित्व आहे. ठेवी घटल्या असून ५६० काेटी रूपयांचे कर्जही महापालिकेवर आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असताना यंदाचा अर्थसंकल्प सादर हाेणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय असणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. निवड झाल्यानंतर तत्काळ अध्यक्षांना अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अध्यक्षांनाही शनिवारीच अर्थसंकल्पाला  स्थायी समितीची मान्यता द्यावी लागेल. अन्यथा एक मार्चनंतर अर्थसंकल्प मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे जाईल. 

मागील पाच वर्षांतील अर्थसंकल्पाचा लेखाजाेखा 

सन २०२१-२२ – सात हजार १३९ कोटी
सन २०२२-२३ – सहा ४९७ कोटी
सन २०२३-२४ – सात हजार १२७ कोटी
सन २०२४-२५ – आठ हजार ६७६ कोटी
सन २०२५-२६ – नऊ हजार ६७५ कोटी