पिंपरी : वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील पाच वर्षांपासून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेचे ४० टक्के होणाऱ्या पाणीगळती, चोरीकडे दुर्लक्ष आहे. प्रशासनाला गळती रोखण्यात अपयश आले असून, अद्याप एकदाही पाण्याचे लेखापरीक्षण (ऑडीट) केले नसल्याचे समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. प्रतिदिन पवनातून ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी), आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ असे ६१५ दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. यापैकी ४० टक्के पाण्याची गळती होते. त्यामध्ये चोरी, वहनतूट होते. गळती, चोरी होत असल्याचे प्रशासन मान्य करते. मात्र, त्यावर ठोस उपाय सापडला नाही. गळती रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले. महापालिकेच्या शाळा, इमारती, उद्यानांसाठीच्या पाण्याचे देयक दिले जात नाही. तसेच झोपडपट्ट्यांमधील नागरिकांकडून वापरल्या जाणाऱ्या पाण्यातून उत्पन्न मिळत नाही. अनधिकृत नळजोडद्वारे पाणीचोरी, नादुरुस्त जलवाहिनीतून पाणीगळती होते. गळतीचे प्रमाण महापालिकेने एकदाही मोजलेले नाही. पाण्याचे लेखापरीक्षण (वॉटर ऑडीट) केले नाही. त्याचे मोजमाप करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जाते.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

शहराला जलकुंभाचे (पाण्याच्या टाक्या) शहर म्हणून ओळखले जात असून १०२ जलकुंभ आहेत. पाणीपुरवठा विभागावर वर्षाकाठी शंभर कोटींहून अधिक रुपये खर्च करत असतानाही मागील पाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही अनियमित, अपुरा व कमी दाबाने होतो

लेखापरीक्षणासाठी जलकुंभावर जलमापके

शहरातील १०२ पैकी ९० जलकुंभावर जलमापक बसविले आहेत. उर्वरित बारा जलकुंभावरही जलमापक बसविण्यात येणार आहेत. त्यानंतर निगडीतील सेक्टर २३ मधून कोणत्या जलकुंभात किती पाणी सोडले. जलकुंभातून किती पाणी वितरित झाले. किती पाण्याचा अपव्यय झाला आणि त्यातून किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यात येईल. जेणेकरून पाण्याचे लेखापरीक्षण होईल, असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची पोलिसांत धाव; मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलं होतं विधान

आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाची गती मंदावली

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, २७ लाखांचा पल्ला गाठला असल्याने दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र होत आहे. राज्य शासनाने स्थगिती उठविल्यानंतरही पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प रखडला आहे. तर, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असून, जलवाहिनी टाकण्याचे केवळ ३५ टक्के काम झाले आहे.

हेही वाचा : Pune : लोकांना घाबरवण्यासाठी रेस्तराँमध्ये गोळीबार, मुळशीतला बांधकाम व्यावसायिक गजाआड

समाविष्ट भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

निघोजे बंधाऱ्यावरील अशुद्ध जलउपसा केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, देहू – आळंदी रस्ता, बोऱ्हाडेवाडी, चक्रपाणी वसाहत, अक्षयनगर तसेच इंद्रायणीनगर परिसरातील पाणीपुरवठा बुधवार (७ ऑगस्ट) पासून विस्कळीत झाला. गुरुवारी (८ ऑगस्ट) सकाळचा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे. पाणीगळती रोखण्यासाठी ४० टक्के भागात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे १५ टक्के पाणीगळती बंद झाली होती. मात्र, पाणीसाठा कमी असल्याने चोवीस तास पाणीपुरवठा बंद करण्यात आला. गळती रोखण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत जलमापके बसविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.