पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी शहर अभियंत्यांनी क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाला एक डिसेंबरची मुदत दिली आहे. शहरातील रस्त्यांवर सद्य:स्थितीत ४८३ खड्डे असून, तीन दिवसांत सर्व खड्डे बुजविले जातील, असा दावा स्थापत्य विभागाने केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात यंदा मे महिन्याच्या मध्यात पावसाला सुरुवात झाली. नाेव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत पाऊस पडत हाेता. पावसाळ्यात पावसाचा मारा आणि बराच वेळ साचलेले पाणी यामुळे रस्त्यांची चाळण झाली. शहरात बारा फुटांपासून ८० फूट रुंदीचे रस्ते आहेत. पक्के, कच्चे असे दोन हजार ७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. डांबरी, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला विविध कामे सुरू आहेत. एका बाजूल महामेट्रो आणि दुसऱ्या बाजूला जलवाहिनी, अर्बन स्ट्रीटचे काम सुरू आहे. त्यामुळे खोदाई करण्यात आली. परिणामी, महामार्गावर कोंडीत भर पडते.

यंदाच्या पावसाळ्यात ५६६७ खड्डे

शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर १५ मे पासून पाच हजार ६६७ खड्डे आढळले. त्यापैकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने दोन हजार ५७८ , बीबीएमने ३६१, खडीने एक हजार ३५९, पेव्हिंग ब्लॉकने २६४, सिमेंट काँक्रिटने ६२२ असे पाच हजार १८४ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत. त्याचे प्रमाण ९१.४८ टक्के आहे. शहरातील केवळ ४८३ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

खड्डेमय रस्त्यांवरून वाहन चालविताना कसरत

खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकतात. दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथांवरही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडलेले दिसून येत आहेत. असे असताना महापालिकेने शहरात केवळ ४८३ खड्डे असल्याचा दावा केला आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी एक डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शहरात सद्य:स्थितीत ४८३ खड्डे बुजविणे बाकी आहे. एक डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आणि खड्डे बुजविल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंता, शहरी दळणवळण विभागाला दिले आहेत, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.