पिंपरी : ह्युमन मेटान्यूमो (एचएमपीव्ही) या विषाणूचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या आठही रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आराेग्य वैद्यकीय विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्ही विषाणूबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. एचएमपीव्ही विषाणूच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, भीतीचे वातावरण निर्माण करू नये. तसेच सर्दी, खाेकला, ताप ही लक्षणे आढळल्यास नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा…भादलवाडीत चित्रबलाक पक्ष्यांची ‘सारंगारा’साठी लगबग

खोकला किंवा शिंका येत असताना तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण, सॅनिटायझरने हात वारंवार धुवावेत. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहावे. भरपूर पाणी प्यावे. पौष्टिक खावे, संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. दररोज स्वच्छ रुमाल वापरावा. हस्तांदोलन, टिश्यू पेपरचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे टाळण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

आठ रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास खाटांची संख्या वाढविण्यात येईल. गरज लागल्यास एक रुग्णालय एचएमपीव्हीसाठी राखीव ठेवण्यात येईल. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची नोंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

हेही वाचा…‘लाडक्या मित्रा’च्या भेटीसाठी कायपण! एकनाथ शिंदे-पोपट धोत्रे यांच्या कान्हूरमधील मैत्रीची चर्चा

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरी असल्यामुळे विविध ठिकाणाहून नागरिक सातत्याने कामानिमित्ताने ये-जा करतात. त्यामुळे शहरात कटाक्षाने खबरदारी घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporations medical department has started precautions after hmpv virus entered india pune print news ggy 03 sud 02