पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप चित्र स्पष्ट हाेत नसल्याने उमेदवारी यादी जाहीर झाली नसतानाच ३२ प्रभागांपैंकी विविध प्रभागात संभाव्य उमेदवारांनी स्वतःच पॅनेल तयार करून प्रचाराचा नारळ फाेडला आहे. मात्र, पक्षाने ऐनवेळी तिकिट नाकारल्यास उमेदवारांची काेंडी हाेण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास साेमवार आणि मंगळवार असे दाेनच दिवस बाकी आहेत. असे असताना एकाही प्रमुख राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार पक्षात माेठ्या प्रमाणात पक्षांतर झाले आहे. शहर भाजपकडून इतर पक्षातील ताकदवान पदाधिकारी, इच्छुक फाेडण्याचा सपाटा लावला आहे. शेवटच्या दाेन दिवसातही माेठ्या प्रमाणात फाेडाफाेडी हाेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकीय समीकरणे दररोज नवी वळणे घेताना दिसत आहेत.

महापालिकेच्या १२८ जागांसाठी शहरातील दाेन हजारपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू असून, त्यासाठी शुभ दिवस अन् मुहूर्तही काढले जात आहेत; मात्र पक्षाकडून अधिकृत उमेदवारी म्हणजेच एबी फॉर्म मिळेल की नाही, अशी धाकधुक इच्छुकांमध्ये आहे. परंतु, काही इच्छुकांनी आपल्या नेत्याने दिलेल्या शब्दांवर पक्षाचे थेट पॅनेलच जाहीर केले आहे. एवढेच नव्हे, तर समाजमाध्यमांवर ते प्रसारित केले जात आहे.

विशेष म्हणजे, या पॅनेलमध्ये जुन्या नव्याचा मेळ साधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रचाराआधीच शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. महापालिकेत गत निवडणुकीप्रमाणे चारसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे. मात्र, आरक्षणात बदल झाल्याने अनेकांचे प्रभाग हातचे गेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी नव्याने, तर काही ठिकाणी जुन्या-नव्याचे एकत्र करून प्रभागाचे पॅनेल केले आहे. अनेक राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून विविध ठिकाणांचे प्रभागातील पॅनेल जाहीर झाल्याचे संदेश आणि छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित होत आहेत. उमेदवारी निश्चित असल्याचा दावा करत काही जणांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत.

आयारामांमुळे भाजप नेत्यांची डाेकेदुखी वाढली

शहर भाजपमध्ये माेठ्या प्रमाणात माजी नगरसेवक, पदाधिकारी, इच्छुकांचे पक्ष प्रवेश झाले आहेत. मात्र, भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी ७३० इच्छुकांनी मुलाखती दिल्या असताना दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी घेण्याचा भाजपचा सपाटा सुरू आहे. भाजपमध्ये वाढलेल्या या इनकमिंग आणि आयारामांमुळे तिकिट देताना नेत्यांची चांगलीच डाेकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. नव्या प्रवेशामधील अनेकांनी थेट पॅनेल जाहीर करत प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावंत आणि पूर्वीपासून प्रभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंताेष निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर प्रवेश झालेल्या पदाधिकाऱ्यांनाच जाबही विचारण्याचे प्रकार घडू लागले आहेत.