पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविण्यासाठी ७७० जणांनी अर्ज घेतले आहेत. इच्छुकांकडून मंगळवार (नऊ डिसेंबर) पासून अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. हे अर्ज प्रदेश नेतृत्वाकडे पाठविले जाणार असून सर्व्हे करण्यात येणार आहे. १२८ जागांसाठी ७७० जणांनी अर्ज घेतल्याने उमेदवार निश्चित करताना भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.  

महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भाजपने गुरुवारपासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत ७७० जणांनी पक्षाच्या मोरवाडीतील कार्यालयातून अर्ज नेले. पुढील चार दिवस उमेदवारी अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. अर्ज देण्यासाठी कोणतेही शक्तीप्रदर्शन करु नये.

स्वत: इच्छुकाने पक्ष कार्यालयात येऊन अर्ज द्यावा. या अर्जांची छाननी केली जाईल. छाननीनंतर सर्व अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविले जाणार आहेत. एका खासगी संस्थेच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे केला जाईल. सर्व्हेच्या आधारे कोणाचे नाव पुढे आहे, त्यानुसार क्रमांक टाकले जाणार आहे. सर्व्हे आणि स्थानिक गाभा समितीच्या (कोअर कमिटी) पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेऊन उमेदवारी दिली जाणार असल्याचे शहर भाजपने स्पष्ट केले.

याबाबत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले, पक्षाकडून ७७० जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मंगळवारपासून अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. छाननी करुन अर्ज प्रदेश नेतृत्वाकडे पाठविले जातील. सर्व्हे होईल. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी विचार केला जाईल. कोण-कोणाचा जवळचा हे पाहून उमेदवारी दिली जाणार नाही. पक्षाचे काम, संघटनेला वेळ दिला अशा लोकांनाच उमेदवारी दिली जाईल. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

शिवसेनेने (शिंदे) मागविले अर्ज

शिवसेनेने (शिंदे) इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांना आज (मंगळवार) पासून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.  https://www.shivsenapimprichinchwad.com यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येथील. वाल्हेकरवाडी येथील पक्ष कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज स्वीकारले जाणार आहेत. विधानसभेचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदार यादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग, जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक इत्यादींसह कार्यअहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. २१ डिसेंबरपर्यंत इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही मागविले अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले आहेत. सर्व १२८ जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे.