पिंपरी : मागील साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर आणखी पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. पावसाला झालेल्या विलंबामुळे आणि पवना धरणातील साठा १९ टक्क्यांवर आल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात आणखी १५ टक्के कपात करण्याचा निर्णय शुक्रवारपासून लागू करण्यात आला. पवना धरणातून ५५० ऐवजी ४७५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी महापालिकेला दिवसाला मिळणार असल्याने पाण्याच्या वेळांमध्ये कपात केली आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरात २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे असतानाच यंदा पावसाने ओढ दिल्याने पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी हाेऊन १९ टक्यांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने १५ टक्के आणखी पाणीकपात करण्याचे आदेश महापालिकेला दिले हाेते. त्यानुसार महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे.

सध्या पवना धरणातून महापालिका ५५० एमएलडी पाणी उचलते. त्यामध्ये आता कपात करून ४७५ एमएलडी पाणी मिळणार आहे. आंद्रा धरण आणि ‘एमआयडीसी’कडून घेण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही १५ टक्के कपात हाेणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात पाण्याच्या तक्रारी वाढल्यानंतर वेळप्रसंगी शहरातील खासगी बाेअरवेल आणि विहिरी ताब्यात घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

नवीन नळजाेडास मनाई

जलतरण तलावासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णतः बंद, गृहनिर्माण संस्थांनी उद्याने, वाहने धुण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, पाणी कपातीच्या कालावधीत नवीन नळजोडणी देण्यात येणार नाहीत. व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प व इतर बिगर घरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.

१८ दिवसांत ४८७ तक्रारी

शहरात सातत्याने अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा हाेत असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मागील १८ दिवसांत विस्कळीत, अपुऱ्या पाणीपुरववठ्याच्या ४८७ तक्रारी सारथी हेल्पलाइनवर आल्या आहेत. यामधील ६२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ४२५ प्रलंबित आहेत.

पाणीकपात १५ टक्के करण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. वाहन धुणे, बागांना अतिरिक्त पाणी देणे, नळ विनाकारण सुरू ठेवणे यांसारख्या बाबी टाळून पाणी बचत करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.