पिंपरी चिंचवडमधील नाशिक फाट्याजवळ बुधवारी अज्ञात व्यक्तींनी एका वृद्धाला पेटवले होते. आज त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी भर दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. उद्धव उनवणे असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेत ते ९० टक्के भाजले होते. उपचारासाठी त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी पत्नी व जावयासह तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव उनवणे हे नाशिकवरून पैसे घेऊन आले होते. त्यांना चार महिन्याचे थकलेले भाडे द्यायचे होते. नाशिक फाट्यावर उतरल्यानंतर अज्ञात तीन व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आणि अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. तसेच खिशातून पैसे काढून घेत तेथून पोबारा केला.
उद्धव उनवणे यांचे पत्नीसोबत वाद असल्याची माहिती समोर आली आहे. उनवणे यांच्याकडे एक डायरी मिळाली असून त्यात पत्नी आणि कुटुंबात वाद असल्याचा उल्लेख आहे. पत्नी आणि जावई व तिघा अज्ञातांविरोधात भोसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad nashik fata senior citizen burn death crime
First published on: 09-03-2017 at 14:23 IST