पिंपरी : नवी सांगवी येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये (उद्वाहक) पहाटे पावणेतीनच्या सुमारास सात जण अडकल्याची घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने लिफ्ट तांत्रिक बिघाड होऊन बंद पडली. पहिल्या आणि तळमजल्याच्या मध्ये लिफ्ट अडकली. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रहाटणी अग्निशामक दलाच्या जवानांनी सर्वांची सुखरूप सुटका केली.

नवी सांगवी येथे आशा शंकर प्लाझा ही इमारत आहे. तेथून रात्री दोनच्या सुमारास सर्वजण बाहेर निघाले होते. तिसऱ्या मजल्यावर सात जण लिफ्टमध्ये चढले. या लिफ्टची क्षमता पाच व्यक्तींची असताना लिफ्टमध्ये सात जण गेले. क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने लिफ्ट तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या दरम्यान अचानक अडकली. इमारतीतील स्थानिक रहिवाशांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. त्यामुळे अडीचच्या सुमारास महापालिकेच्या रहाटणी अग्निशामक केंद्राला हा प्रकार कळविण्यात आला. अग्निशामक दलाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण असल्याने यंत्रणेवर ताण आला होता. गच्चीवरील कंट्रोल रूममधून लिफ्ट खाली घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यामध्ये अपयश आले. सोसायटीने बोपोडीहून लिफ्ट मेंटेनन्स कर्मचाऱ्यांना बोलावले. मात्र, त्यांनाही दरवाजा उघडता आला नाही.

जवानांनी बाहेरचा लोखंडी गज कापला. लिफ्टच्या दरवाजाच्या पट्टीमध्ये तांत्रिक बदल करून दरवाजा उघडला. पहाटे साडेपाच वाजता हे ‘रेस्क्यू ऑपरेशन’ यशस्वी झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अग्निशामक दलाचे फायरमन पृथ्वीराज पोवार, प्रथमेश शितोळे, प्रतीक जवंजाळ, सचिन पालवे, अभिजित यादव आणि चालक सतीश साबळे यांनी या मोहिमेत भाग घेतला.