पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार हे ३४ वर्षांचे समीकरण तुटल्यानंतर आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे कोणाच्या हातात जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. १९९१ पासून शहरातील प्रत्येक निर्णय अजित पवार हेच अंतिम करत असत. त्यांच्या निधनानंतर आता शहरातील पक्षाची धुरा पवार कुुटुंबातील सदस्य घेणार, की स्थानिक नेत्याकडे जबाबदारी साेपविली जाते, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार हे ३४ वर्षांपासून समीकरण हाेते. शहरातील काेणताही निर्णय अजित पवार हेच घेत असत. महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असताना प्रत्येक निर्णय त्यांच्या मान्यतेने हाेत हाेता. शहराध्यक्ष काेण असावा, तसेच लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसाठीची उमेदवारी, महापालिकेतील पदे काेणाला द्यायची याचे सर्व निर्णय अजित पवार हेच घेत हाेते. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील प्रदेश पातळीवरील एकही नेता शहराच्या राजकारणात लक्ष घालत नव्हता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड आणि अजित पवार हे समीकरण घट्ट झाले हाेते. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, नगरसेवक, अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार थेट नावानिशी ओळखत हाेते. त्यामुळे त्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले हाेते. पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
अनेक पदाधिकाऱ्यांनी साथ सोडल्याने २०१७ मध्ये महापालिकेतील पक्षाची सत्ता गेली. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक निवडून आले हाेते. सत्ता नसताना कामे मार्गी लागत नसल्याने नगरसेवक अजित पवारांकडे दाद मागत हाेते. पवार अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून कामे मार्गे लावण्याची सूचना देत हाेते. त्यामुळे नगरसेवकांना त्यांचा आधार वाटत हाेता. पवार २०२२ मध्ये भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शहरातील सर्व संघटना, नगरसेवक त्यांच्यासोबत राहिले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तेत एकत्र असले, तरी शहरात मात्र दाेन्ही पक्षांचे सूर जुळले नाहीत. कटुता वाढत गेली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी साथ सोडल्यानंतरही पवार हे ताकदीने निवडणुकीला सामोरे गेले. अपयश आले. पण, ३७ नगरसेवक निवडून आले. अजित पवार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने महापालिकेमध्ये सत्ता नसली, तरी काही अडचण येणार नाही, असा विश्वास नगरसेवकांना होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनाने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. पवार यांच्याशिवाय भाजपविरोधात कसे लढायचे, अशी परिस्थिती नगरसेवकांची झाली आहे. पवार यांच्यानंतर शहरातील जबाबदारी काेणावर पडणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
पार्थ पवारांकडे जबाबदारी?
मावळमधून २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर पार्थ पवार शहराच्या राजकारणात सक्रिय झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पिंपरीत प्रचार केला होता. मात्र, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ते फिरकले नाहीत. खासदार सुनेत्रा पवार यांनी बैठका घेतल्या होत्या. शहराची माहिती असल्याने पार्थ यांच्याकडे जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक आमदार, ३७ नगरसेवक
महापालिकेत सत्ता नसली, तरी शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेसची ताकद आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत ३७ नगरसेवक निवडून आले. ७६ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे शहरात संघटना मजबूत आहे. पिंपरीचा आमदार पक्षाचा आहे. तीन नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक हाेणार आहेत.
सुनेत्रा पवारांना विचारून गटनेता निवडणार
महापालिकेतील गटनेता निवडण्यासाठी अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची मंगळवारी बैठक झाली हाेती. यामध्ये तीन ते चार नावांवर चर्चा झाली हाेती. गटनेता निवडण्याचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्याचा ठराव झाला हाेता. पाटील यांच्यामार्फत नावे अजित पवार यांच्याकडे दिली जाणार हाेती. परंतु, बुधवारीच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. आता खासदार सुनेत्रा पवार यांना विचारून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गटनेता निश्चित केला जाणार आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व काेण करणार हे त्यांचे कुटुंबीय ठरवतील. शहराध्यक्ष म्हणून स्थानिक पातळीवर मी निर्णय घेईन. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून गटनेता निवडला जाईल, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष याेगेश बहल म्हणाले.

