पिंपरी : महापालिकेच्या चिंचवड येथील जलतरण तलावात बुडून १७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. श्रवण समीर गायकवाड (वय १७, रा. द्वारका साई सोसायटी, गोलांडे चौक, रहाटणी) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रवण हा आपल्या मित्रांसोबत चिंचवड – केशवनगर येथील गावडे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आला होता. तो पोहायला शिकत होता. शुक्रवारी तो पाण्यात उतरला. मात्र, परत वर आला नाही. ही बाब त्याच्या मित्रांनी जीवरक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी श्रवण याला पाण्यातून वर काढले. बेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठेकेदार व जीवरक्षकांवर कारवाईची मागणी

श्रवणच्या मृत्यूचे शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पडसाद उमटले. भाजप नगरसेवक सुरेश भोईर म्हणाले, ‘गावडे जलतरण तलाव आकाराने छोटा आहे. या तलावावर चार जीवरक्षक ठेकेदाराने नियुक्त केले आहेत. ही घटना घडली तेव्हा जीवरक्षक काय करीत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाला जीव गमवावा लागला. महापालिकेने संबंधित ठेकेदार व जीवरक्षकांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी’.

सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस हवालदाराचे अपघाती निधन

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असलेले पोलीस हवालदार भगवंता चिंधू मुठे (वय ४१) यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे कारच्या भीषण अपघातात निधन झाले. हा अपघात अकोले येथील हिलेदेव घाटात गुरुवारी (दि. १४) रात्री अकराच्या सुमारास घडला. भगवंता मुठे यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. मुठे हे घरातील एका लग्नासाठी गावी गेले होते. दिवसभर लग्नासाठी थांबून ते त्यांच्या मुळगाव सापेवाडी येथे निघाले होते. त्यांचा मेहूणा, मुलगा आणि ते कारमधून जात होते.

मेहूणा कार चालवत होता. हिलेदेव घाटात मेहुण्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मुठे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच त्यांनी  मोबाईलवरून आपल्या घरी आणि सहकारी पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. दरम्यान  उपचारासाठी नेत असताना मुठे यांचा मृत्यू झाला. त्याचा मेहूणा आणि मुलगा या अपघातात जखमी झाले आहेत.