पिंपरी : कचरा संकलनासाठी आलेल्या चार चाकी टेम्पोने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी लगत थांबलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा टेम्पोखाली सापडून मृत्यू झाला. हा अपघात निगडी येथील साईनाथनगरमध्ये सोमवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला. गणरायाच्या आगमनाची धामधुम सुरू असतानाच चिमुकलीच्या अपघाती मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संस्कृती भागवत बिरादार (वय ५, रा. यमुनानगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. कचरा संकलन टेम्पो चालक राहुल प्रल्हाद चव्हाण (वय २८, रा. साने चौक, चिखली) आणि त्याचा साथीदार राजू कुमार गायकवाड (वय ३८, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) यांना निगडी पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा संकलन
करणारा टेम्पो साईनाथनगर परिसरात कचरा गोळा करण्यासाठी आला होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला या टेम्पोने जोरदार धडक दिली. याचवेळी दुचाकीलगत थांबलेली संस्कृती दुचाकीच्या धक्क्यामुळे टेम्पोच्या खाली आली. टेम्पो अंगावरून गेल्याने संस्कृती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
