पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. येथील एका पेट्रोल पंपावर सरकारी आदेशाचा हवाला देत इंधनाची मर्यादित विक्री करण्याचा बोर्ड लावण्यात आला. हा बनावट बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवा पसरल्या आणि नागरिकांकडून ‘पैनिक बाइंग’ (भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त खरेदी) करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

पेट्रोल पंपाच्या बोर्डवर काय लिहिले होते?

निगडी परिसरातील संबंधित पेट्रोल पंपावर बेकायदा एक बोर्ड लावण्यात आला होता. त्यावर शासनाच्या आदेशानुसार वाहनांना मर्यादित प्रमाणातच इंधनाचा पुरवठा केला जाईल, असे लिहिले होते.

दुचाकी वाहने : केवळ २०० रुपयांचे पेट्रोल.

चारचाकी वाहने : जास्तीत जास्त १००० रुपयांचे पेट्रोल.

खाजगी वाहने (डिझेल) : प्रति वाहन केवळ १००० रुपयांचे डिझेल.

व्यावसायिक वाहने (कमर्शियल) : जास्तीत जास्त २००० रुपयांचे डिझेल. असे बोर्डवर लिहिले होते.

हा बोर्ड समोर येताच वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक आपापल्या गाड्यांच्या टाक्या फुल करण्यासाठी पंपांवर धावू लागले. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

असोसिएशन आणि तज्ज्ञांच्या मते, काही पंप चालकांकडून स्थानिक पातळीवर स्टॉक व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही खाजगी कारणामुळे असे पाऊल उचलले गेले असण्याची शक्यता आहे, परंतु याला ‘सरकारी आदेश’ असे नाव देणे पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. या बोर्डमुळे शहरात इंधनाचा काळाबाजार आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. असोसिएशनने स्पष्ट केले आहे की, शहरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही खोट्या बातमीवर किंवा अफवेवर विश्वास ठेवू नये आणि पैनिक बाइंग करणे टाळावे.

“असोसिएशनच्या वतीने असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारने किंवा स्थानिक प्रशासनानेही इंधन विक्री मर्यादित करण्याबाबत कोणतीही नोटीस किंवा आदेश जारी केलेला नाही. पिंपरी-चिंचवडमधील ज्या पेट्रोल पंपाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, आम्ही त्याची पूर्ण तपासणी केली आहे. तो पेट्रोल डीलर आमच्या संघटनेचा भाग नाही. एखाद्या पेट्रोल पंप चालकाने असा बोर्ड लावला असेल किंवा असा काही निर्णय घेतला असेल, तर तो पूर्णपणे त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा याच्याशी काहीही संबंध नाही. शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, असे पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.