पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सण उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, या उद्देशाने महापालिका आणि बचत गटाच्या माध्यमातून दापोडीत निर्माल्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती निर्मिती प्रकल्प मागील एक वर्षापासून कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माल्य फुलांपासून धूप, अगरबत्ती अन् कंपोस्ट खतही तयार केले जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवात निर्माण झालेल्या २९४ मेट्रिक टन निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासूनही अगरबत्ती तयार केली जाणार आहे. त्यामुळे निर्माल्यातून दुर्गंध नव्हे, तर सुगंध दरवळणार आहे.
विविध सण, उत्सवामध्ये देवाच्या पूजेसाठी हार, फुलांचा वापर केला जाते. वर्षभर नागरिक, भाविक विविध मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी फुले, हार घेऊन जातात. या निर्माल्य फुलांसह पिंपरीतील फुल मार्केटमध्ये जमा झालेले निर्माल्य बचत गटाच्या महिला गाेळा करतात. या निर्माल्यातून फुले वेगळी करून सुगंधी पावडर, धूप कांडी, अगरबत्ती तयार केली जात आहे. महापालिका व चार महिला बचत गटांच्या माध्यमातून दापाेडी येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शहरात यंदा गणेशोत्सवात २९४ मेट्रिक टन निर्माल्य निर्माण झाले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने निर्माल्य कचऱ्यात मिसळू नये यासाठी विसर्जन घाटांवर स्वतंत्र निर्माल्य संकलन आणि वर्गीकरणाची व्यवस्था केली होती. बचत गटाच्या महिलांनीही घरोघरी जाऊन निर्माल्य जमा केले. यापासून सुगंधी पावडर, धूप कांडी, अगरबत्ती तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. ते खत उद्यान, बाग, गृहनिर्माण सोसायटीतील हिरवळ, शेतीसाठी अल्पदरात विकले जाते. त्यामुळे बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम हाेत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
जलप्रदूषण रोखण्यास मदत
गणेशोत्सवात नदी व तलावात निर्माल्य टाकल्याने माेठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. महापालिकेने निर्माल्य नदी व नाल्यात टाकण्यास मज्जाव केला. विर्सजन घाटावरील कुंडात निर्माल्य जमा केल्याने नदी प्रदूषण कमी होण्यास मदत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन निर्माल्य, शाडू मातीचे संकलन केले आहे. निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून धूप, अगरबत्ती अन् कंपोस्ट खत तयार केले जात आहे. या उपक्रमास महापालिकेचा समाज विकास व आरोग्य विभागाचे सहकार्य लाभत आहे. या प्रकल्पामुळे महिलांच्या हाताला रोजगार मिळत असून प्रकल्पासाठी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) लवकरच मशिनरी उपलब्ध होणार असल्याचे महिला बचत गटाच्या सदस्या राखी धर यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात २९४ टन निर्माल्य संकलित झाले. त्याचे वर्गीकरण करून बचत गटाला देण्यात आले. त्यापासून सुगंधी धूप व अगरबत्ती तयार करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळत आहे. उर्वरित निर्माल्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
