पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. शहरातील पालखी मार्गावरील अडथळे तातडीने दूर करावेत. रस्ते रुंद करण्यात यावेत. वारकऱ्यांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन आणि गर्दी नियंत्रणासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (७ जुलै) प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त चौबे यांनी श्री क्षेत्र देहूगाव येथील मुख्य मंदिर परिसर, दर्शनबारी, पालखी प्रस्थान मार्ग तसेच विसाव्याची ठिकाणे असलेल्या अनगडशहाबाबा दर्गा आणि चिंचोलीगाव येथील श्री शनिमंदिर परिसराची पाहणी केली. देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालखी सोहळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी, गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नियोजनाचा आढावा घेतला. वारकऱ्यांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात दर्शन घेण्याबरोबरच पालखी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात येत असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली.

देहू मंदिर परिसरातील दर्शनबारीत होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य प्रकारे बॅरिकेडिंग करणे, दोरखंडांचा वापर वाढविणे, गर्दीचे नियोजन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, महापालिका अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, श्वेता खेडकर, संदीप आटोळे, मारुती जगताप, धीरज पाटील, विक्रांत देशमुख, महापालिका उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, महामेट्रोचे अभियंता यतेंद्र कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी संरक्षक जाळ्या

भक्ती-शक्ती ते मोरवाडी चौक या मार्गावर सुरू असलेल्या पुणे मेट्रोच्या कामामुळे मोठे खांब आणि बॅरिकेडिंगमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे बॅरिकेडिंग आतमध्ये सरकविणे, पालखी मार्गातील अडथळे दूर करणे, आवश्यक ठिकाणी मजबूत संरक्षक जाळ्या उभारणे आणि राडारोडा हटवून रस्ता समतल करण्याच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेला असलेला राडारोडा हटवून रस्ता रुंद करणे, अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटणे, मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या कमानी हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून पालखी मार्गाची आणि विविध विसावा ठिकाणांची महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि पालखी सोहळा अधिक शिस्तबद्ध व सुरळीत पार पडावा, या उद्देशाने आयुक्तांनी संबंधित विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,सहशहर अभियंता बापू गायकवाड,प्रभाग अधिकारी अतुल पाटील, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता शिवाजी चौरे, वैशाली ननावरे, कार्यकारी अभियंता विजय भोजने, उमेश मोने यांच्यासह महापालिकेचे विविध विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रोच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी दूर करा

सकाळी भक्ती-शक्ती चौकातून या पाहणीला सुरुवात झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामामुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यानंतर विठ्ठलवाडी येथील हनुमान मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील पालखी तळ, दर्शन रांग आणि मंडप व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. मार्गावरील अनधिकृत टपऱ्या आणि रस्त्यांवर येणाऱ्या लहान व्यावसायिकांमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मेट्रो कामाचे लावलेले बॅरिकेड्स हटवणार

दरम्यान पालखी विसावा ठिकाणाची पाहणी करताना आयुक्तांनी मेट्रो कामाचे लावलेले बॅरिकेड्स हटवण्यासोबतच प्रकाश व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा चोख ठेवण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्याचा विचार करता मैदानावर चिखल होऊ नये म्हणून तात्काळ खडी टाकण्याचे आणि शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यानंतर आकुर्डीतील खंडोबा चौकात मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे पालखीला अडथळा येणार नाही याची खातरजमा करून, रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि झाडांच्या फांद्या छाटणे आदी कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचित केले.

तसेच दापोडी येथील संत तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळाची पाहणी करून आयुक्तांनी समाधान व्यक्त करत आवश्यक त्या सुधारणांचे आदेश दिले. पालखी सोहळा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्याने, महापालिकेने आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा या सर्व सुविधा वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.