पिंपरी : काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासांत ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ८२.४२ टक्के झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसीसह काही नगरपालिका, मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १६ टक्क्यांवर आला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने १९ जूनपासून १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. तेव्हापासून महापालिकेकडून एक ते दीड तासाने पाण्याच्या वेळा कमी केल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पावसाने एक जुलै पासून धरण परिसरात हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. रविवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ८२.४२ टक्के झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत ६६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

१५ टक्के पाणीकपात कायम

जून महिना काेरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा वाढल्याने पिंपरी-चिंचवड शहरात १९ जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात रद्द हाेण्याची अपेक्षा शहरवासीयांना हाेती. मात्र, धरण शंभर टक्के भरले नसून एल निनोचा प्रभाव कमी झाला नाही. त्यामुळे पाण्याचे आतापासूनच नियोजन करून काटकसरीने वापर करण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. महापालिकेने १५ टक्के पाणी कपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा असेल तरच १५ टक्के पाणी कपात रद्द केली जाईल. अन्यथा ही पाणी कपात पुढे कायम राहील, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

सव्वा सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. ताे साडेसहा वर्षांनंतरही कायम आहे. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याची नागरिकांची सातत्याने ओरड सुरू आहे. भामा आसखेडचे पाणी येईपर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

शहराची लोकसंख्या ३८ लाख, दिवसाला ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे.

प्रस्तावित लोकसंख्या अंदाजानुसार २०३१ मध्ये ५५ लाख, २०४१ मध्ये ९५ लाख आणि २०५१ मध्ये १ कोटी ३५ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता असून त्यानुसार अनुक्रमे ९४९ एमएलडी, १,६३८ एमएलडी आणि २,३२८ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.