पिंपरी : शहरातील काही प्रमुख रस्त्यांसाठी आणलेले सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) धोरण गुंडाळल्यानंतर आता संपूर्ण शहरासाठी नव्याने वाहनतळ धोरण निश्चित केले आहे. रस्त्यालगत, रस्ताबाह्य पार्किंगचे नियोजन केले असून, यासाठी ‘टेलिस्कोपिक’ शुल्क रचना, पार्किंग पास व निवासी पार्किंगनुसार शुल्क निश्चित केले आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख असून, वाहनांची संख्या २५ लाखांच्या पुढे आहे. प्रशस्त रस्ते अशी ओळख असलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध भागात वाढत्या वाहनांमुळे प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. अनधिकृत पार्किंग, पादचारी मार्गावरील अतिक्रमणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शिस्तबद्ध, सुरक्षित व शाश्वत पार्किंग व्यवस्था विकसित करण्यासाठी नव्याने वाहनतळ धोरण तयार केले आहे. वाढती लोकसंख्या, वाहने, प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा वाढता ताण याचा नवीन धोरणात विचार करण्यात आला आहे. पार्किंग व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने धोरण तयार केल्याचे दळणवळण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी सांगितले.
पार्किंग शुल्क- प्रतितास (रुपयांमध्ये)
वाहन प्रकार – रस्त्यालगत (उच्च मागणी क्षेत्र) – दुचाकी – १०, चारचाकी – ४०, हलकी व्यावसायिक वाहने – ६०,
अवजड वाहने, बस – १०० आणि तीनचाकी २० रुपये
तर मध्यम मागणी क्षेत्रात – दुचाकी ५, चारचाकी २०, हलकी व्यावसायिक वाहने ३०, अवजड वाहने, बस ५० आणि तीनचाकी १० रुपये आणि रस्ताबाह्य क्षेत्र शुल्क
दुचाकीसाठी ५, चारचाकी १०, हलकी व्यावसायिक वाहने १५, अवजड वाहने, बस २० आणि तीनचाकी ५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
‘टेलिस्कोपिक’ शुल्क प्रणाली
वाहने थांबण्याच्या कालावधीनुसार प्रतितास शुल्कामध्ये वाढ करण्यासाठी ‘टेलिस्कोपिक’ शुल्क प्रणाली आणली आहे. त्यामुळे रस्त्यालगतच्या दीर्घकालीन पार्किंगला आळा, पार्किंग जागांचा अधिक कार्यक्षम वापर, पार्किंगची उपलब्धतता आणि रस्ताबाह्य पार्किंग सुविधेच्या वापरास प्रोत्साहन मिळेल, असा दळणवळण विभागाचा दावा आहे. चारचाकी वाहनांसाठी पहिल्या दोन तासांकरिता ४०, चार तासांसाठी ५०, सहा तासांसाठी ६०, आठ तासांसाठी ७०, १० तासांसाठी ८० रुपये आणि १० तासांनंतर प्रत्येक अतिरिक्त तासासाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. दुचाकीसाठी दोन तासांकरिता १०, चार तास १५, सहा तास २०, आठ तास २५, १० तास ३० रुपये आणि १० तासांनंतर प्रत्येक अतिरिक्त तासासाठी ४० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
पास आणि निवासी परवाना
रस्ताबाह्य दैनंदिन पास (१२ तास) -दुचाकी ६०, चारचाकी १२०, रस्ताबाह्य मासिक पास दुचाकी १८००, चारचाकी ३६००,
रस्त्यालगत निवासी मासिक परवाना दुचाकीसाठी १८००, चारचाकीसाठी ७,२०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
वाहतुकीला शिस्त
शहरातील वाहतूककोंडी सोडविणे, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनतळ धोरण आणले आहे. ‘पे ॲण्ड पार्किंग’च्या स्थळांव्यतिरिक्त सर्व पार्किंग बेकायदा ग्राह्य धरले जाईल. त्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले. शहराचा सुनियोजित विकास आणि नागरिकांना वाहतुकीची कोणतीही अडचण भासू नये, यासाठी वाहनतळ धोरण आणले आहे. यामुळे शहरातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होईल. हे धोरण राबवताना केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढाच हेतू नसून, पादचारी आणि सायकलस्वारांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.
वाहतूककोंडी कमी होणार
शहराची लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला अधिक शिस्तबद्ध व कार्यक्षम बनविण्यासाठी वाहनतळ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. नागरिकांना सोईस्कर, सुरक्षित व सुलभ पार्किंग सुविधा उपलब्ध करून देतानाच वाहतूककोंडी कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर करणे आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना देण्यात येणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
