PCMC BJP Corporators List Finalized: सत्ताधारी भाजपची नावे निश्चित होत नसल्याने रखडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड येत्या सोमवारी (२० एप्रिल) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्ये अखेर एकमत झाल्याने सात जणांची नावे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुणे महापालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नावे नऊ मार्चला जाहीर झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपमधील स्थानिक नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने स्वीकृत नगरसेवकांचा तिढा वाढला होता. त्यात जुने विरुद्ध नवे, आमदारसमर्थक विरुद्ध निष्ठावंत असा संघर्ष सुरू होता. भाजपमध्ये आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे प्रमुख गट आहेत. त्यांनी आपापल्या समर्थकांची नावे सुचवली होती. भाजपमधील एका गटाने ज्येष्ठ, निष्ठावंतांची काही नावे सुचवली आहेत. माजी नगरसेवकही इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला संधी द्यायची याबाबत एकमत झाले नाही. परिणामी, नावाची निवड लांबणीवर पडली होती.
सात जागांसाठी दोनशेहून अधिक अर्ज आल्याने शहर भाजपने स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय प्रदेश नेतृत्वावर सोपविला होता. इच्छुकांची नावे प्रदेश नेतृत्वाला पाठविली होती. त्यातून सात नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सर्वसाधारण सभेसमोर फेरप्रस्ताव
दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तीन जणांची नावे मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आली होती. त्यात माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे, फजल शेख यांचा समावेश आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्याच सदस्यांचा प्रस्ताव असल्याने हा विषय फेरसादर करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते. त्यानुसार प्रशासनाने दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याचा विषय सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या सात नावांवर पक्षाचे एकमत झाले आहे. प्रदेश नेतृत्वाकडून अंतिम झालेल्या नावांची यादी येईल. येत्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत ती नावे सादर केली जातील, असे पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह नेते
प्रशांत शितोळे यांनी सांगितले.
