पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याकडील सर्व विभाग इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे पाणीपुरवठा, संध्या वाघ यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प आणि विनय ओव्हाळ यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी हे बदल केले आहेत.
शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे उद्यान व क्रीडा स्थापत्यचे अतिरिक्त कामकाज देण्यात आले आहे. सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांच्याकडे अतिरिक्त विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये पाणीपुरवठा विभागासह भामा आसखेड, आंद्रा प्रकल्प, पवना बंदिस्त जलवाहिनी आणि सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश आहे. सहशहर अभियंता संध्या वाघ यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाची, तर सह शहर अभियंता विनय ओव्हाळ यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
प्रमोद ओंभासे निलंबित
लाच प्रकरणात अटक झालेले महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. अटकेच्या दिवसापासून म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून निलंबन लागू केले आहे. पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून अशोभनीय वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित विभागाने १५ दिवसांत दोषारोपपत्र ठेवावे. चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी नियुक्तीची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
ओंभासे मुख्य अभियंता दोन पदावर कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीदरम्यान तक्रारदाराच्या ३८ लाख रुपयांच्या निविदेच्या फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी अर्धा टक्का दराने १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे आदेशात नमूद आहे. याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचेही आदेशात म्हटले आहे.
मुख्यालय सोडण्यास मनाई
निलंबन काळात वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ओंभासे यांना मुख्यालय सोडता येणार नाही. अन्य नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नसून, त्याबाबतचा मासिक दाखला दिल्यानंतरच निर्वाहभत्ता मिळेल. कार्यालयात अथवा आवारात गैरवर्तन आढळल्यास स्वतंत्र शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
