पिंपरी : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ७० हजारांची लाच घेणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला (बीट निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडले.
उमेश अरुण लोंढे (वय २८, रा. शिवराजनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या अभियांत्रिकी सहायकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ५८ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली होती. तक्रारदार यांची पिंपळेगुरव येथे एक गुंठा जागा असून त्यांनी तीन मजली बांधकाम केले आहे; परंतु महापालिकेची परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचे दर्शवून महापालिकेकडून २५ फेब्रुवारीला तक्रारदारांना नोटीस दिली होती. या नोटिसीविरोधात तक्रारदार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन तक्रारदार यांना महापालिकेत जाऊन नियमानुसार दंड भरून त्यांनी केलेले बांधकाम नियमित करून घेण्याबाबत सूचित केले होते.
त्यानंतर बांधकाम नियमित करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून कार्यरत असलेल्या लोंढेने तक्रारदार यांना भेटण्यास बोलवून अनधिकृत बांधकाम पाडावे लागेल, असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने निकालाची प्रत दाखवली; परंतु लोंढेने उच्च न्यायालयाचा निकालाकडे दुर्लक्ष केले. तीन मजली इमारत अनधिकृत असल्याचे सांगून त्या इमारतीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई न करण्यासाठी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार केली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास क्षेत्रीय कार्यालयाच्या वाहनतळामध्ये लोंढेला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उमेश लोंढे हा ‘ड’ प्रभागात बीट निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. लाड पागे समितीच्या माध्यमातून त्याला अनुकंपा तत्त्वावर तीन महिन्यांपूर्वीच रुजू करून घेतले होते. बी.ई.सिव्हिल (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग-स्थापत्य अभियांत्रिकी) पर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे.
