पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) देयकांबरोबर २४ हजार ६२६ थकबाकीदार मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजावल्या. संबंधितांनी थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा मिळकतकर तत्काळ भरावा, असे आवाहनही महापालिकेने केले. तसेच, सर्व मिळकतधारकांना घरपोच देयके वितरणाचे काम पूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात सात लाख ६६ हजार ३८५ मिळकतींची नोंद आहे. त्यांपैकी आतापर्यंत एक लाख ५३ हजार ९०२ मिळकतधारकांनी कर भरला आहे. यामधून महापालिकेला १४८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्या मिळकतधारकांना अद्याप ऑनलाइन अथवा घरपोच स्वरूपात देयक प्राप्त झालेले नाही, त्यांनी संबंधित कर संकलन विभाग कार्यालयाशी संपर्क साधून देयक प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे.

‘शहराच्या विकासासाठी मिळकतकर हा महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी देयके वितरित केल्यामुळे नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे,’ असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले.

३० जूनपर्यंत मालमत्ता करावर विविध सवलती

कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता कर भरण्यावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेत वेळेत मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असून, कुटुंबातील महिलेच्या नावावर असलेल्या एका निवासी मालमत्तेला ३० टक्क्यांपर्यंत विशेष सवलतीचा लाभ देण्यात येत आहे.

१ लाख ८२ हजार ३३५ मालमत्ताधारकांनी घेतला लाभ

महापालिकेच्या कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल १ लाख ८२ हजार ३३५ मालमत्ताधारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेतला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. महापालिकेने नागरिकांना घरबसल्या सुलभ पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ऑनलाइन भरण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.