पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी अभिषेक बारणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) अर्ज दाखल केला नव्हता. बारणे यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बारणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. भाजपने महापालिका तिजोरीची चावी बारणे यांच्या हाती सोपविली आहे.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी २५ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांच्याबरोबर वाकडचे प्रतिनिधीत्व करणारे संदीप कस्पटे, रहाटणीतून दुसऱ्यांदा निवडून आलेले बाबा त्रिभुवन यांच्यात चुरस होती. परंतु, पक्षश्रेष्टींनी बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार अभिषेक बारणे यांनी २५ फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड निश्चित होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी (२८ फेब्रुवारी) स्थायी समितीच्या सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. बारणे यांच्या अर्जाची छाननी केली. त्यात त्यांचा अर्ज पात्र ठरला. बारणे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे कौर यांनी जाहीर केले.
स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व
स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे चार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचा एक सदस्य आहे. १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. परिणामी, बारणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
कोण आहेत अभिषेक बारणे?
महापालिका तिजोरीच्या चाव्या हाती घेणारे अभिषेक बारणे दुसऱ्यांदा भाजपकडून निवडून आले आहेत. थेरगाव भागाचे ते महापालिकेत प्रतिनिधीत्व करतात. मागील पंचवार्षिकमध्ये बारणे यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. ‘ग’ प्रभागाचे अध्यक्षपही त्यांनी भूषविले आहे. आमदार शंकर जगताप यांचे अतिशय निकटवर्तीय अशी बारणे यांची ओळख आहे.
भाजपकडून समतोल
भोसरी विधानसभा मतदारसंघात महापौरपद, पिंपरीत उपमहापौर आणि चिंचवडकडे सभागृह नेतेपद दिल्यानंतर भाजपने विषय समित्या वाटपात समतोल साधला आहे. स्थायी समितीसह शिक्षण समिती चिंचवड मतदारसंघात, विधी आणि महिला व बालकल्याण समिती भोसरीकडे तर शहर सुधारणा आणि क्रीडा समिती पिंपरी मतदारसंघातील नगरसेवकाला दिली आहे. तीन महिला आणि तीन पुरुष नगरसेवकांना समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिली आहे.
