पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात एकाचदिवशी सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पोलिसांकडून त्याला दुजोरा दिला जात नव्हता. सात जणांपैकी चार जणांचा विषारी दारु पिल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून तिघे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत.

फुगेवाडीतील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तीघे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. फुगेवाडी परिसरात चार जणांचा संशयास्पद मृत्यूबाबत माहिती मिळाली. दापोडी पोलिसांनी चौकशी केली. त्यात चारही जणांनी विषारी दारु पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीवरुन दापोडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गुन्हा करण्याचे उद्देशाने अपायकारक पदार्थद्वारे इजा करणे, इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती, अपायकारक पेयाची विक्री, महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तीघे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७), विजय प्रकाश राठोड (वय ३१), राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४), राजेंद्र राजपूत (वय ५१), अकबर पठाण (वय ५२), आनंद पांडुरंग देसाई (वय ६०), आनंद काशीनाथ निकाळजे (वय ७०, सर्व रा. फुगेवाडी) यांचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.