पिंपरी : पिंपळे निलख परिसरातील रक्षक चौकात उड्डाणपूल उभारताना ठेकेदाराने उताराच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात होऊ शकतात. त्यासाठी या उड्डाणपुलाची लांबी वाढवून उतार कमी करण्याची सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. उपययोजना न करता पूल खुला केल्यास आणि भविष्यात पुलावरील उतारावरुन पडल्याने अपघात झाल्यास सल्लागार, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खासदार बारणे यांनी गुरुवारी अधिकारी आणि सल्लागारासह पुलाच्या कामाची पाहणी केली. सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, सल्लागार कंपनीचे डॉ. संजय नाईक, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुनील पवार, संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते, कनिष्ठ अभियंता प्रणिता पिंजन यावेळी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने रक्षक चौकात उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, पुलाचा दोन्ही बाजूंचा उतार अत्यंत तीव्र आहे. उताराचा भाग तुलनेने अधिक असल्याने भविष्यात अपघाताची शक्यता टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. यापूर्वी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाचा उतारही असाच तीव्र झाल्याने तिथे सातत्याने अपघात होतात. रक्षक चौक हा वर्दळीचा व वाहतुकीचा रस्ता असल्याने या तीव्र उतारामुळे भविष्यात येथेही मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सल्लागार, अधिकाऱ्यांनी पुलाच्या उताराच्या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी पुलाची लांबी वाढवावी. उतार कमी करण्याबाबत तांत्रिक फेरविचार करावा. या कामासाठी झालेला खर्च, कामाची सुरुवात आणि तांत्रिक माहितीचा आढावा घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी, सूचना खासदार बारणे यांनी केली आहे.

कोंडी सुटणार

रक्षक चौकातील हा उड्डापूल रहदारीसाठी खुला झाल्यास कोंडीचा त्रास कमी होऊन रहदारी विना अडथळा सुकर होण्यास मदत होणार आहे. पिंपळे निलखकडून येणाऱ्या वाहनांसाठी खालच्या बाजूने स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलातील वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांसाठी उड्डाण पुलाच्या खालच्या बाजूने मार्गाची सुविधा ठेवण्यात आली आहे. यामुळे लष्करी वाहतूक, पीएमपीएमएल बस, पादचाऱ्याचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

सिग्नल विरहित वाहतूक

सांगवी फाटा ते रावेत या दिशेने जाण्या-येण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करण्यात येणार आहे. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर सिग्नल विरहीत वाहतूक शक्य होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधन व वेळेची बचत होणार आहे, असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. २६.४ मीटर रुंद आणि ३४५ मीटर लांब व ५.५ मीटर उंचीचा हा पूल आहे.