पिंपरी : दापोडी, फुगेवाडी परिसरातील दारू विक्रीच्या स्थानिक नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारींकडे पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर हा जीवघेणा अनर्थ टाळता आला असता. पोलिसांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला.
फुगेवाडीतील विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाची गोऱ्हे यांनी रविवारी भेट घेतली. त्या म्हणाल्या, ‘शिवसेनेचे (शिंदे) फुगेवाडी-दापोडीचे शाखाप्रमुख निलेश हाके यांनी यापूर्वीच या परिसरातील अवैध दारूविक्रीचा आणि भयंकर परिस्थितीचा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला होता. खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्ते वारंवार ओरडून सांगत असतानाही, जर वेळीच योग्य आणि कडक कारवाई झाली असती, तर आज अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते’.
विषारी दारूच्या वाढत्या विळख्यावर चिंता व्यक्त करताना गोऱ्हे म्हणाल्या, ‘विषारी दारूचा प्रश्न केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशभर सुरू आहे. अशा दारूमध्ये प्रामुख्याने ‘मिथेनॉल’ सारख्या अत्यंत घातक केमिकलचा वापर केला जातो. हे मिथेनॉल येते कुठून? त्याचा पुरवठा कोण करते आणि ते नक्की कुठे पोहोचवले जाते? या संपूर्ण साखळीवर उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाने सतत बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे’.
वरिष्ठ पातळीवरून तक्रारींचे निराकरण
‘अनेकदा स्थानिक नागरिक आपल्या भागात चालणाऱ्या अवैध धंद्यांबद्दल पोलिसांकडे तक्रारी करतात. मात्र, पोलीस त्या तक्रारींना गांभीर्याने घेत नाहीत. जोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची पोलिसांकडून त्वरित दखल घेतली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मंत्रालयाच्या पातळीवरून थेट ‘मॉनिटरिंग’ होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
