पिंपरी : गणेश आगमन ते विसर्जन मिरवणुकी दरम्यान डीजे लावून ध्वनी प्रदूषण तसेच लेजरचा वापर केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकूण ९१ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले आहेत. यातील ८६ मंडळांच्या डीजेचे साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

न्यायालयाने डीजेच्या वापरावर मर्यादा घातल्या आहेत. आवाजाची पातळी विविध भागांत दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी असणारे बंधनकारक आहे. डीजेच्या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. यामुळे मर्यादेत राहून विसर्जन मिरवणूक काढण्याबाबत प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. तरी देखील काही उत्साही गणेशोत्सव मंडळे नियमांना पायदळी तुडवत डीजेचा तसेच लेजरचा वापर करतात.

पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वी मंडळांच्या बैठका घेऊन ध्वनी प्रदूषण न करण्याचे आवाहन केले होते. त्याकडे काही मंडळांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दरम्यान ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळावर कारवाई केली आहे. परिमंडळ एक मध्ये निगडी मध्ये सात, पिंपरी मध्ये दोन, सांगवी मध्ये १५, संत तुकाराम नगर एक, दापोडी तीन असे १५ गुन्हे दाखल केले आहेत. परिमंडळ दोन मध्ये बावधन ११, काळेवाडी १०,  हिंजवडी एक, वाकड मध्ये २२ असे सर्वाधिक ४४ गुन्हे दाखल केले आहेत.

परिमंडळ तीन मध्ये भोसरी एमआयडीसीत दोन, भोसरीत पाच आणि चाकण दक्षिण येथे एक असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ चार मध्ये तळेगाव दाभाडे पाच, तळेगाव एमआयडीसी दोन, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी एक आणि शिरगाव मध्ये दोन असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. चारही परिमंडळाच्या हद्दीत पोलिसांनी ९१ गुन्हे दाखल केले असून  लाखो रुपयांचे ८६ मंडळांचे डीजेचे साहित्य जप्त केले आहे.