पिंपरी : शहरात अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या एका संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थ विकणाऱ्या टोळीवर २०२६ मधील ‘मकोका’ची पहिली कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टोळीप्रमुख मेहबूब कमरुद्दीन करपुडे उर्फ मुसा खान (वय ३२, हडपसर), प्रतीक सचिन सपकाळ (वय २८, खडकी), अमीन फिरोज खान (वय २३, घोरपडी पेठ), रफीक अबुबखर मेमन (वय ६२, कोंढवा, पुणे) आणि वसीम इसाक बेग (वय ३७, धाराशिव) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ डिसेंबर २०२५ रोजी दोघांना अमली पदार्थांची विक्री करताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याकडे ५५ ग्रॅम २१ मिली ग्रॅम ‘एमडी’ हा अमली पदार्थ सापडला होता. आरोपी एका संघटित टोळीच्या माध्यमातून हा व्यवसाय करीत होते. पोलिसांनी या कारवाईत ‘एमडी’सह मोबाइल फोन आणि एक चारचाकी वाहन असा एकूण आठ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी या टोळीवर ‘मकोका’ लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी मंजुरी दिली आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, श्रेणी उपनिरीक्षक स्वामीनाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निखिल शेटे, गणेश करपे, जावेद बागसिराज, किशोर परदेशी, सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, रणवीर माने यांच्या पथकाने केली आहे.