पिंपरी : गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेला नवे बळ देणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आधारित एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीची (एचपीसी) मान्यता मिळाली आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाअंर्गत चाकण, तळेगाव दाभाडे आणि भोसरी एमआयडीसी, तसेच हिंजवडी आयटी पार्क येथे ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याच्या माध्यमातून कडक निगराणी ठेवली जाणार आहे.
वेगाने नागरीकरण होत असलेले पिंपरी-चिंचवड, वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि आयटी हब यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर भर देत हा शहराव्यापी सीसीटीव्ही प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्याला आता अधिकृत मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी मिशन आणि महापालिकेमार्फत आधी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे एकाच एकात्मिक प्रणालीत जोडले जाणार आहेत.
तसेच, महत्त्वाच्या आणि अद्याप सीसीटीव्ही नसलेल्या भागांत नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. विशेषत: चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी, तसेच हिंजवडी आयटी हब येथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक निगराणी ठेवली जाणार आहे. देहू व आळंदी या धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये तसेच सण-उत्सव व पालखी मिरवणुकीदरम्यान होणार्या लाखोंच्या गर्दीचे नियोजन आणि वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सीसीटीव्ही व्यवस्थेचे मजबूत जाळे उभारण्यात येणार आहे.
एआय आधारित प्रगत चित्रफित विश्लेषण (व्हिडिओ अॅनालिटिक्सच्या) सहायाने संशयास्पद हालचाली, वाहतूक नियमभंग, गर्दी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. नव्याने उभारण्यात येणार्या पोलीस आयुक्तालयात अत्याधुनिक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन केले जाणार असून येथील थेट दृश्ये परिमंडळ पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग आणि पोलीस ठाण्यांना उपलब्ध राहणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती (पीआयसी) स्थापन करण्यात आली. त्यात महापालिका, पीएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमआयडीसी आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. या समितीत महापालिका, पीएमआरडीएचे आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यालयातील पोलीस उपायुक्त, गुन्हे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त, पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सहायक पोलीस आयुक्त, एमआयडीसी आणि राज्य शासनाचा एक प्रतिनिधी अशी १२ जणांची समिती असणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
शहराव्यापी एकात्मिक व केंद्रीकृत सीसीटीव्ही व्यवस्था
एआय-आधारित चित्रफित विश्लेषणचा वाप
औद्योगिक, आयटी व धार्मिक परिसरांवर विशेष लक्ष
वाहतूक, गर्दी आणि आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम
