पिंपरी : विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी, तसेच शैक्षणिक परिसर ‘अमली पदार्थ’मुक्त करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शाळा-महाविद्यालय परिसरात अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ताथवडे येथे राबविलेल्या या कार्यक्रमास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुमारे ६०० शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रतिनिधी असे सुमारे १२०० जण उपस्थित होते.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पोलीस, शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सामूहिक सहभागातून प्रत्येक शाळा व महाविद्यालय ‘अमली पदार्थ’मुक्त करणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे अभियान केवळ जनजागृतीपुरते मर्यादित न ठेवता सातत्यपूर्ण मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

प्रत्येक शाळा व महाविद्यालयाने अमली पदार्थ प्रतिबंधक समिती स्थापन करावी. या समितीत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधींचा समावेश करावा. जबाबदार व इच्छुक विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी स्वयंसेवक नियुक्त करावेत. प्रत्येक संस्थेने स्वतंत्र ‘अमली पदार्थ’मुक्तचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

मानस हेल्पलाइनवर तक्रार

अमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ हेल्पलाइन क्रमांक ७७९८१००११२, तसेच ‘मानस’ हेल्पलाइन क्रमांक १९३३ वर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले. अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी प्रास्ताविक केले. मुक्तांगण संस्थेच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी मार्गदर्शन केले. अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम यांनी अमली पदार्थविरोधी शपथ दिली. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी आभार मानले.