पिंपरी : कंपनीने घालून दिलेल्या गोपनीयतेच्या अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्याने कंपनीच्या विदाची (डेटा) चोरी केली. हा प्रकार बारणे येथे उघडकीस आला.

याप्रकरणी कंपनीच्या अधिकारी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बावधन परिसरातील एका कंपनीत काम करत होता. कंपनीने त्याला अधिकृत ई-मेल आयडी दिला आहे. त्या ईमेल आयडी वरील माहिती त्याने स्वतःच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर पाठवली. तसेच काही माहिती त्याने त्याच्या भावाला ई-मेलद्वारे पाठवली. कंपनीच्या डिझाइन्स आणि ड्रॉइंगचा विदाची चोरी केला. कंपनीच्या गोपनीयतेच्या अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.

कोयत्याच्या दहशतीने अंडी पळवली

चिकनच्या दुकानदाराला कोयत्याने मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. २५० रुपयांची अंडी पळवल्याची घटना काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी दुकानदाराने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयुष आनंद वाकोडे (वय २०, रा. काळेवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चिकनचे दुकान आहे. आरोपी मंगळवारी रात्री दुकानात आला. त्याने दुकानदाराला मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर कोयता हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. दुकानातील ५०० रुपयांची अंडी फोडून नुकसान केले. २५० रुपयांची अंडी आरोपी घेऊन गेला. पोलिसांनी आरोपी आयुष याला अटक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

डिलिव्हरी बॉय विरोधात गुन्हा

एका कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तरुणाने बनावट ऑर्डर देऊन ऑर्डर देण्यासाठी नेलेल्या वस्तूंच्या पॅकेटमध्ये वेगळ्या वस्तू ठेवून ते पार्सल पुन्हा कंपनीस पाठवून कंपनीची एक लाख २१ हजार १३२ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पुनावळे येथे घडला. तुकेश बाबासाहेब राक्षे (२०, आकुर्डी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राक्षे हा एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. त्याने बनावट ग्राहकाच्या नावे स्वतः ऑर्डर बुक केली. त्या ऑर्डर मधील मूळ वस्तू काढल्या. दुसऱ्या वेगळ्या वस्तू पार्सलच्या पॅकेटमध्ये बंद केल्या. ते पार्सल पुन्हा कंपनीत परत करून कंपनीची एक लाख २१ हजार १३२ रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी राक्षेला अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.

तीन कारवयांमध्ये तीन पिस्तूल, दोन तलवार जप्त

निगडी, बावधन आणि चिंचवड येथे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवयांमध्ये पोलिसांनी तीन पिस्तूल, तीन काडतुसे आणि दोन तलवारी जप्त केल्या आहेत. याबाबत बुधवारी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तीन कारवायांमध्ये तिघांना अटक केली आहे.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई आकुर्डी येथे करण्यात आलेल्या कारवाईत राज अशोक कांबळे (२१, आकुर्डी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई संदेश देशमुख यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज याच्याकडून एक पिस्तूल दोन तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

बावधन पोलिसांनी जाधव वस्ती येथे कारवाई करत आकाश नामदेव पवार (२२, बावधन) याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. बावधन पोलीस तपास करत आहेत. चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी येथे हुसेन उर्फ पंजा रमजान बागवान (२९, ताथवडे) याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काढतुसे जप्त केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.