पिंपरी : गणेशोत्सवाच्या काळात ‘डीजे’ वापराबाबत न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळावेत. प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना झालेली इजा पुन्हा भरून येत नाही. त्यामुळे त्याचा वापर टाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गणेश मंडळांना केले. ‘गणेशोत्सव जल्लोषात साजरा करा. या जल्लोषात जर कोणी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याबाबत पोलिसांना माहिती द्या. अशा लोकांना सरळ करण्याचे कौशल्य पोलिसांकडे असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित श्री मोरया पुरस्कार २०२५ पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी आकुर्डी येथे झाला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त बोलत होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, संदीप आटोळे, रोहिदास पवार, धीरज पाटील, मारुती जगताप, डॉ. विक्रांत देशमुख, गणेश इंगळे या वेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी सार्वजनिक गणेश मंडळे व नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. सामाजिक प्रबोधनाच्या उद्देशाने सायबर सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक नियमांचे पालन व इतर जनहिताच्या सामाजिक विषयांवरही देखावे साकारावेत. अमली पदार्थाच्या दुष्परिणामांवर आधारित प्रभावी, संदेशप्रधान व जनजागृतीपर देखावे साकारावेत. अमली पदार्थमुक्त समाजनिर्मितीच्या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त चौबे यांनी केले. मंडळाने गणपती आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये मूर्तीबाबत खबरदारी घ्यावी. गणेश मंडळांनी त्यांचे स्वयंसेवक सतत मंडप परिसरात ठेवावेत. तसेच परिसरात चोरी आणि इतर गंभीर घटनांवर निगराणीसाठी सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मंडळांना ऑनलाइन परवानगी
गणेश मंडळांना महापालिका, पोलिसांकडून ऑनलाइन परवानगी देण्यात येईल. गणपतीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडणे, इलेक्ट्रिक केबल काढण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची पथके सर्व मंडळांच्या संपर्कात राहून त्यांच्या मिरवणूक मार्गांची पाहणी करीत आहेत. मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावटीचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा, तसेच निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
श्री मोरया पुरस्काराने गणेशोत्सव मंडळांचा सन्मान
पोलीस आयुक्तालय स्तरावर सन २०२५ या वर्षासाठी प्रथम क्रमांक मयूर मित्र मंडळ मार्केटयार्ड चाकण, द्वितीय क्रमांक सुवर्ण मित्र मंडळ क्रीडा व कला मंच पिंपरी, तृतीय क्रमांक सिद्धीचा गणपती महिला मंडळ बावधन यांना मिळाला. परिमंडळ स्तरावर परिमंडळ एक मध्ये प्रथम एस के एफ गणेशोत्सव मंडळ चिंचवड, द्वितीय भैरवनाथ मित्र मंडळ सांगवी, तृतीय स्वराज्य मित्र मंडळ पिंपरी, परिमंडळ दोन मध्ये प्रथम सम्राट मित्र मंडळ थेरगाव, द्वितीय शिवतेज मित्र मंडळ उर्से शिरगाव, तृतीय गणेश तरुण मंडळ तळेगाव दाभाडे यांना देण्यात आला.
परिमंडळ तीन मध्ये प्रथम नवयुग मित्र मंडळ चाकण, द्वितीय जय गणेश प्रतिष्ठान आळंदी, तृतीय जय बजरंग मित्र मंडळ चिखली यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदर्श देखावा या प्रकारात विशाल मित्र मंडळ थेरगाव तर आदर्श मिरवणूक प्रकारात श्री शिवछत्रपती मित्र मंडळ रावेत यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. यावर्षीचा श्री मोरया फिरता करंडक मयूर मित्र मंडळ चाकण या मंडळाने मिळवला.
