पिंपरी : पिस्तुलचा दुरुपयोग, विविध प्रकारचे दाखल असलेले गुन्हे, मुदतीत शस्त्र खरेदी न करणे, वृद्धत्व आलेल्या अशा १५ जणांचे पिस्तुल परवाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रद्द केले आहेत. यामध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी प्रभाग स्वीकृत नगरसेवकाचा समावेश आहे. तसेच सबळ कारणाअभावी ६८ जणांना शस्त्र परवाने नाकारले आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शस्त्र परवान्यासंबंधात कठोर धोरण अवलंबिले आहे. शस्त्र परवाना प्रकरणांच्या आढाव्यात १५ व्यक्तींचे पिस्तुल परवाने रद्द केले आहेत. ६८ नवीन शस्त्र परवाना मागणी करणाऱ्या व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहे. शस्त्र परवानाधारक मयुर काळुराम भोईर (वय ३०, रा.हिंजवडी), सुभाष भिकाजी सपकाळ (वय-७० वर्षे, रा.नवी सांगवी, पुणे), विजय नामदेव लांडे (वय-४८ वर्षे, रा. भोसरी, पुणे), साहिल राजेंद्र ढमाले (वय-३२ वर्षे, रा.देहुगाव, पुणे) आणि शांताराम दत्तात्रय चव्हाण, (वय-४१ वर्षे, रा.आंबेठाण, पुणे) यांच्याविरुद्ध शस्त्राचा दुरुपयोग केल्याने व इतर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या प्रकरणांची तात्काळ दखल घेऊन त्यांचे पिस्तुल परवाने रद्द करण्यासाठी प्राथमिक चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती परवानाधारक यांची कसुरी आढळुन आल्याने पाच परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवाना मंजुर केलेल्या व्यक्ती, ज्यांनी विहित मुदतीत शस्त्र खरेदी केले नाहीत, अशा दोन शस्त्र परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच ज्या शस्त्र परवानाधारकांना वृद्धत्व आले मृत्यू झाला आहे अशा एकूण आठ परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. त्यानुसार १५ शस्त्र परवानाधारक यांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेले आहेत.

नवीन शस्त्र परवाना प्राप्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्राप्त अर्जापैकी एकूण ६८ व्यक्तींना शस्त्र परवाने नाकारले आहेत. या प्रकरणांच्या प्राथमिक चौकशीमध्ये नमुद व्यक्तींना शस्त्र परवाने मंजुर करण्यासाठी कोणतेही सबळ कारण, आधार नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना शस्त्र परवाने नाकारण्यात आलेले आहेत. भविष्यात देखील शस्त्र परवान्यासंबंधात अशाच प्रकारे कडक धोरण अवलंबिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. विजय लांडे हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी प्रभाग स्वीकृत नगरसेवक आहेत.