पिंपरी : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे शनिवारी उघडकीस आले. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी घरातून निघून गेले होते.

विजय मोतीलाल कोळी (वय ३६) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन वर्षाचा मुलगा आहे.  त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सहायक म्हणून कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी हे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. जाताना त्यांच्याकडे सरकारी पिस्तूल असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता. त्यांचे शेवटचे ठिकाण निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली.

ड्रोनच्या साहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात कोळी यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी सरकारी पिस्तूलही मिळून आले. प्राथमिक तपासात त्यांनी त्याच पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली जाणार असल्याचे निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.