पिंपरी : चार रुग्णांचे खोटे आरोग्य विमा दावे दाखल करून खासगी विमा कंपनीची तीन लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथील एका रुग्णालयात ३ मे ते १० सप्टेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला.
याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या शाखा व्यवस्थापकाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४० वर्षीय डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणुकीच्या इराद्याने बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे फिर्यादीच्या इन्शुरन्स कंपनीकडे चार रुग्णांचे खोटे आरोग्य विमा दावे दाखल केले. तळेगाव दाभाडे येथील एका बँकेच्या शाखेत रुग्णालयाच्या खात्यावर तीन लाख ६२ हजार १७९ रुपये ऑनलाईन स्वीकारून आरोपीने कंपनीची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
कामाचे पैसे मागणाऱ्या कामगाराला मारहाण
कामाचे पैसे मागितले म्हणून तिघांनी मिळून एकाला लाकडी काठी आणि हाताने मारहाण केली. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी मावळ तालुक्यातील बेबडओहोळ येथे घडली. याप्रकरणी राजीवकुमार कृष्णमोहन ठाकूर (वय २५, रा. बेबडओहोळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी बाळासाहेब ढमाले (वय ३८), आयुष शरद ढमाले (वय १९) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आरोपी विकी ढमाले यांच्याकडे कामाला आहे. तसेच आरोपींच्याच घरी राहतात. फिर्यादी हा आरोपी यांच्या घरी कामाचे पैसे मागण्यासाठी गेले असता आरोपींना त्याचा राग आला. त्यातून आरोपीने फिर्यादी यांना लाकडी काठीने मारहाण केली. आरोपी आयुष याने फिर्यादीला हाताने मारहाण केली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी दिघी येथे मॅग्झीन चौक ते भोसरी रस्त्यालगत करण्यात आली. निखिल बाबुराव पोतदार (वय २०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुधीर हरिश्चंद्र डोळस (वय ४०, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांचा मनाई आदेश असताना ५० हजार किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक हजार किमतीचे एक जिवंत काडतूस स्वतःजवळ बाळगताना आढळून आला. पिस्तुल व जिवंत काडतुसासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
विक्रीसाठी अंमल पदार्थ बाळगणाऱ्या तरुणाला अटक
मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी अण्णासाहेब मगरनगर, चिंचवड येथे करण्यात आली. इस्तियाक इकबाल चौधरी (वय ३३, रा. अण्णासाहेब मगरनगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद विजय रुद्राक्षे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला २२.२६ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगताना आरोपी आढळून आला. या अंमली पदार्थासह एक मोबाईल व इतर साहित्य असे एकूण दोन लाख ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पथकाने आरोपीला अटक केली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
