पिंपरी : गणेशोत्सव निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पोलीस अंमलदारांपर्यंत दोन हजार ७२७ पोलीस अधिकारी-कर्मचारी, ५५० होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्य राखीव पोलीस बल, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), दंगल नियंत्रण पथक आणि विशेष (स्ट्रायकिंग) पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा दोन हजार २५१ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. गणेशाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी तसेच विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. बंदोबस्तात एक सहपोलीस आयुक्त, एक अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त आणि नऊ सहायक पोलीस आयुक्त तैनात असतील. त्यांच्यासह ६४ पोलीस निरीक्षक आणि २९१ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. दोन हजार ३५५ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला ५५० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक गणेश मंडळांचा परिसर, प्रमुख चौक, संवेदनशील ठिकाणे आणि विसर्जन मार्गांवर आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.

विशेष पथकेही सज्ज

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव पोलीस बल, बॉम्ब शोधक व नाशक पथकाची एक तुकडीही सज्ज आहे. त्याबरोबर चार दंगल नियंत्रण पथक आणि १७ विशेष (स्ट्रायकिंग) पथके बंदोबस्तात असणार आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून विसर्जनापर्यंत शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये १६ ते २९ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे, बंद आदी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला आहे.

शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास बंदी

मनाई आदेशाच्या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्याची हत्यारे, काचेचे तुकडे किंवा रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाले, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू सोबत बाळगण्यासही प्रतिबंध आहे.

पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढणे यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह घोषणा, सभ्यता व नीतिमत्तेला धोका निर्माण करणारी भाषणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शासकीय सेवेतील व्यक्ती तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद आहे